Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीशिवसेनेच्या वतीने ९ मार्चला कुडाळात 'जागर स्त्री शक्तीचा'

शिवसेनेच्या वतीने ९ मार्चला कुडाळात ‘जागर स्त्री शक्तीचा’

महिलांसाठी विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्ग: जागतिक महिला दिनानिमित्त कुडाळ -मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला आघाडी (सिंधुदुर्ग)च्या वतीने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम रविवार दि. ९ मार्च २०२५ रोजी दुपारी २.३० ते रात्री १० या वेळेत, कुडाळ पोस्ट ऑफीस चौक नजिकच्या श्री सिंधुदुर्ग राजा मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहीती जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ.दीपलक्ष्मी पडते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत सौ. पडते बोलत होत्या. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, चांदणी कांबळी, रेवती राणे, अनघा रांगणेकर, राकेश नेमळेकर आदी उपस्थित होते.

सौ.पडते म्हणाल्या, आ.निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन एकलव्य न्यायच्या अध्यक्षा रेणूताई व्यास यांच्या हस्ते व आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर व फोंडाघाट सरपंच संजना आंग्रे उपस्थित राहणार आहेत.

महिला ढोल ताशा पथकाच्या ढोल वादनाने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. महिलांसाठी पाककला स्पर्धा होणार आहे. खाद्य पदार्थ चिकन स्टाटर्स ही या स्पर्धेची थीम आहे. सहभागी स्पर्धकांनी पाककलेची कृती लिहून आणणे आवश्यक आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रत्येक सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात येणार आहे. उखाणे स्पर्धाही होणार आहे. यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना चांदीच्या वस्तू बक्षिस स्वरूपात देण्यात येणार असून, प्रत्येक सहभागी स्पर्धकाला भेटवस्तू देण्यात येणार आहेत. निमंत्रित डान्सचा नृत्याविष्कार कार्यक्रम सादर होणार आहे. विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. यात विशेष करून हॉटेल खानावळ चालविणा-या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

खेळ पैठणीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. यातील प्रथम क्रमांक पैठणी, द्वितीय क्रमांक सोन्याची नथ, तृतीय क्रमांक चांदीचा करंडा व प्रत्येक सहभागी स्पर्धकाला भेटवस्तू देण्यात येणार आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येणार असून, यातील विजेत्या स्पर्धकांना चांदीचे नाणे बक्षिस देण्यात येणार आहेत. उपस्थित सर्व महिलांना सौभाग्यवान भेट हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात येणार आहे. खाऊगल्लीही असणार असून, यात शॉपिंग स्टॉल्स सहभागी होणार आहेत. सर्व महिला प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असणार आहे. पाककला स्पर्धेसाठी सिद्धी शिरसाट व रचना नेरूरकर आणि उखाणा स्पर्धेसाठी चांदणी कांबळी व रेवती राणे यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी. तसेच सर्वानी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख कुडाळकर व माजी जि.प.अध्यक्षा पडते यांनी केले आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -