Sunday, May 11, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्या अबू आझमींचे निलंबन

औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्या अबू आझमींचे निलंबन
मुंबई : प्रसारमाध्यमांशी बोलताना औरंगजेबाचे भरभरुन कौतुक करणारे आमदार आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमींना निलंबित करण्यात आले आहे. विधानसभेत एकमताने हा ठराव झाला.



राज्य शासनाच्यावतीने चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर केला. औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी अबू आझमी यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले. याआधी 'फक्त अधिवेशन काळापुरते निलंबन नको. त्यांचे सर्व भत्ते बंद करा. आमदार निधी व पगार ही बंद करा. औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही. प्रस्तावात सुधारणा करा. कारवाई अधिक कठोर करा'; अशी मागणी आमदार आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज पूजनीय आहेत. त्यांचा अपमान करणाऱ्याला ,सहजतेने जाऊ देऊ शकत नाहीत. कठोर कारवाई व्हायला हवी; असेही मुनगंटीवार म्हणाले.



मुनगंटीवार यांची मागणी ऐकल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नियमाची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लोकप्रतिनिधीला एका सत्रापेक्षा जास्त काळासाठी निलंबित करता येत नाही. याच कारणामुळे अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर केल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेता विशिष्ट परिस्थितीत अबू आझमींची आमदारकीच निलंबित करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी समिती स्थापन करू; असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Comments
Add Comment