अमेरिका २ एप्रिलपासून भारतावर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादणार
नवी दिल्ली : आमच्याकडून अतिरिक्त आयात शुल्क घेणाऱ्या देशांवरही आम्हीही तेवढाच कर लादणार आहोत. २ एप्रिल २०२५ पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी बुधवारी वाढीव आयात शुल्काचे समर्थन केले. त्यांच्या या घाेषणने मुळे भारतासह चीन, दक्षिण कोरियासह अनेक देशांचा समावेश अमेरिकन आयातीवर उच्च शुल्क लादणाऱ्या देशांच्या यादीत करण्यात आला आहे. अमेरिकेला पुन्हा श्रीमंत आणि महान बनवण्यासाठी ही योजना आहे, असा पुन्नरुच्चारही ट्रम्प यांनी अमेरिकेच्या काँग्रेसला संबोधित करताना केला.
या वेळी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) म्हणाले की, भारत आमच्याकडून १००% ऑटो टॅरिफ आकारतो, चीन आमच्याकडून दुप्पट टॅरिफ आकारतो, दक्षिण कोरिया आमच्याकडून चार पट टॅरिफ आकारतो. हे मित्र आणि शत्रू दोन्ही बाजूंनी घडत आहे. ही व्यवस्था अमेरिकेसाठी न्याय्य नाही. इतर देशांनी अनेक दशकांपासून आपल्याविरुद्ध आयात शुल्क आकारले आहे. आता त्या इतर देशांविरुद्ध त्यांची शस्त्रे वापरण्याची आपली वेळ आली आहे. युरोपियन युनियन, चीन, ब्राझील, भारत आणि असंख्य इतर देश आमच्याकडून खूप जास्त आयात शुल्क आकारतात. त्या तुलनेत आम्ही त्यांच्यापेक्षा कमी दर आकारतो. हे खूप अन्याय्यकारक आहे.
परस्पर कर २ एप्रिलपासून होणार लागू
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जाहीर केले की, परस्पर कर २ एप्रिलपासून लागू होतील. ते आमच्यावर कोणताही कर लावतील, आम्ही त्यांच्यावर कर लावू. ते आमच्यावर कोणताही ‘कर’ लावतील, आम्ही त्यांच्यावर परत कर लावू. त्यांनी आम्हाला त्यांच्या बाजारपेठेपासून दूर ठेवण्यासाठी गैरशुल्क लादले, तर आम्ही त्यांना आमच्या बाजारपेठेपासून दूर ठेवण्यासाठी गैरशुल्कांचा अडथळा उभारु.
अमेरिकेला गेल्या अनेक दशकांपासून प्रत्येक देशाने लुटले
अमेरिकेला गेल्या अनेक दशकांपासून जवळजवळ प्रत्येक देशाने लुटले आहे. आता आम्ही हे पुन्हा होऊ देणार नाही. जकातींमधून मोठा महसूल मिळेल. यामुळे अभूतपूर्व नोकऱ्या निर्माण होतील, असा विश्वासही डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी व्यक्त केला.
निकृष्ट दर्जाच्या परदेशी वस्तू अमेरिकेत येत आहेत
२ एप्रिलपासून अमेरिकेत येणाऱ्या परदेशी कृषी उत्पादनांवर नवीन शुल्क लागू केले जाईल. आम्ही एक नवीन व्यापार धोरण आणू, जे अमेरिकन शेतकऱ्यांसाठी उत्तम असेल. घाणेरड्या आणि निकृष्ट दर्जाच्या परदेशी वस्तू अमेरिकेत येत आहेत, ज्यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परदेशी ॲल्युमिनियम, तांबे, लाकूड आणि स्टीलवर २५ टक्के कर लादण्यात आला आहे. हे फक्त अमेरिकन नोकऱ्यांचे रक्षण करण्याबद्दल नाही; ते आपल्या देशाच्या आत्म्याचे रक्षण करण्याबद्दल आहे.”
मेक्सिको आणि कॅनडाला देण्यात येणारे अनुदान बंद
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत आणि चीनसह अन्य देशांबरोबरच मेक्सिको आणि कॅनडालाही लक्ष्य केले. कॅनडा आणि मेक्सिकोच्या आयात शुल्कात वाढ करण्याबराेबरच यापुढे या दाेन देशांना देण्यात येणारे अनुदान आम्ही बंद करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शुल्क रचनेवर कोणीही वाद घालू शकत नाही
फेब्रुवारी महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला. यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले होते की, त्यांचे प्रशासन लवकरच भारत आणि चीनसारख्या देशांवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादेल. अमेरिकेच्या प्रत्युत्तरात्मक शुल्क भारतासाठीही लागू होईल. शुल्क रचनेवर कोणीही त्यांच्याशी वाद घालू शकत नाही.