लाहोर : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या फायनलमध्ये खेळणारा दुसरा संघ ठरला आहे. आता भारताविरुद्ध फायनलमध्ये न्यूझीलंड खेळणार आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला होता. यात न्यूझीलंड संघाने बाजी मारली.
न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद ३६२ धावांचा डोंगर उभारला होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे आव्हान काही पेलवले नाही आणि अखेरीस त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. आफ्रिकेच्या संघाला ५० षटकांत केवळ ९ बाद ३१२ धावा करता आल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या काही फलंदाजांनी चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. शेवटच्या क्षणापर्यंत डेविड मिलरनेही चांगली लढत दिली मात्र त्यांनी जर शेवटी शेवटी केलेली फटकेबाजी आधी केली असती तर कदाचित त्यांना विजय मिळवता आला असता.
डेविड मिलरने या सामन्यात १०० धावा केल्या. टेम्बा बावुमाने या सामन्यात ५६ धावा केल्या. तर रॅसी वॅन डेर डुसेनने ६९ धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने ५० षटकांत ६ बाद ३६२ धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड तोडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या हंगामात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध ५ बाद ३५६ धावा केल्या होत्या.
टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत ६ बाद ३६२ धावा केल्या. सामन्यात न्यूझीलंडची सुरूवात चांगली राहिली. विल यंग आणि रचिन रवींद्रने मिळून ७.५ षटकांत ४८ धावांची भागीदारी केली. यंग २२ धावा करून परतला. त्यानंतर केन विल्यमसन्स आणि रचिन रवींद्रने दुसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी केली. रचिन रवींद्नने १०८ धावांची खेळी केली. तर केन विल्यमसन्सने १०२ धावा फटकावल्या.