मुंबई (मानसी खांबे): तो भरडा, चिरका आवाज, त्यात त्याचा टेम्पो चढा. क्षणभरासाठी का होईना पण पदपथावरील त्या वादंगाने कानठळ्या बसल्या होत्या. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा ‘त्या’ दोन कुटंबांतील वादावादीकडे खिळून राहत होत्या. दोन मद्यपी पुरुषांमधील झगडा आता बायका पोरांना पण त्यात ओढत होता. कोणी पोलके सांभाळत अंगावर धावून जात होते. तर कोणी बेंबीच्या खाली नेसलेल्या साडीचा पदर सावरत शिव्यांची लाखोली वाहत होते. कान, नाक टोचलेल्या काटकुळ्या पोरीही भांडायला मागे नव्हत्या. दोन्ही बाजूने शाब्दिक घमासान सुरू झाले होते. आवाजाने कळस गाठला होता. प्रश्नाला प्रतिप्रश्न होता. एकमेकांच्या मानेवर बसू पाहणारी माणसे काही वेळातच शांत झाली. बहुधा सामंजस्याची भूमिका त्यांनी घेतली असावी. ते काहीही असो. पण २४ तास रस्त्यावरच राहणाऱ्या कुटुंबांनी येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
सणसुद आले की मुंबईच्या पदपथांवर ‘हे’ लोक हमखास नजरेत पडतात. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला हार, आपट्याची पाने यांचा ठेला, स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडे, एरवी फुगे, खेळणी असा लवाजमा घेऊन एखाद्या पुलाखाली, रस्त्यांवर हे विक्रेते दिसतात. भरड्या, चिरक्या आवाजात आपल्याच भाषेत ते एकमेकांशी संवाद साधत असतात. थोडे नजरेने चाचपडले तर मग आसपास त्यांचे बहरलेले कुटुंब दिसते. त्यात चार – पाच लहानग्यांच्या वावर असतो. नवजात बालके, त्यांना दूध पाजणाऱ्या माता दिसतात. एका बाजूला फुलांची माळ विणताना दुसरीकडे मांडीवरच्या बाळाला दूध पाजणे या दुहेरी कामासोबत त्यांच्या तोंडाची बडबड सुरूच असते. लगतच्या भिंतीवर त्यांचे कपडे वाळत घातलेले असतात. रस्त्याच्या एखाद्या कोनाड्यात आडोशाला झाडाला खेटून फाटलेल्या साड्यांनी चार कोपरे झाकले की यांची मोरी तयार असते. महिला वर्गाची आंघोळीची सोय झाली. चार विटा रस्त्यावरच मांडून त्याला लाकडाची धग मिळाली की मग यांची चूल पेटली. त्यावरच कधीतरी भाकरी, भात खाऊन पोट भरायचे. कधी कोणी खायला दिले तर दिले. नाहीतर कधीतरी उपाशीच झोपायचे. मुळात पैसे कमवायचे स्त्रोतच कमी.
धंदा झाला तर झाला, नाहीतर कधी गल्ल्यात खडखडाट. शनिवार आला की यांचा हक्काचा धंदा म्हणजे ‘नजर उतरणारे’ लिंबू विकणे. हे लोक धंदा श्रीमंत होण्यासाठी नव्हे तर पोटाची खळगी भरण्यासाठी करतात. कमवलेले पैसे साठवून ठेवायला कपाट नाही, बँकेत अकाउंट नाही. ते तयार करण्यासाठी आधार कार्ड, किंवा पॅन कार्डही नाही. साठवलेले पैसे, वस्तू चोरी होतील याचे भय नाही. मुळात तसा काही प्रकारच यांच्याकडे नसावा बहुधा. वयाच्या १६-१७ व्या वर्षीच लग्न बंधनात अडकल्याने मुलेही तुलनेने लवकरच जन्माला येतात. उन्हाळा असो पावसाळा असो वा हिवाळा रस्त्याचा कडा म्हणजेच फुटपाथ हेच त्यांचे घर होते. या रस्त्यावरच ही मुलेबाळे लहानाची मोठी होतात.
पैशाच्या मोहापायी खेळलेल्या जुगारात हक्काचं घर गेल्यामुळे, तर एखाद्याच्या कुटुंबातील सदस्याला आजाराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी या लोकांनी मुंबईची वाट धरली. मात्र मुंबईत राहणे प्रत्येकालाच जमत नाही. त्यात डोक्यावर कर्जाचा डोंगर असतो. मग त्यात हे फूटपाथच यांचे घर होते आणि रस्त्यावर संसार मांडला जातो. कोणी कारवाईच्या नावाखाली हकलवून लावते. तर कोणी कशी बशी मिळवलेली ओळखपत्रे हिसकावून नेते. तर कधी पोटाची खळगी भरण्यासाठी पायपीट करून तयार केलेले विक्रीचे सामान देखील जप्त केले जाते. नोकरी केली तरी कोण पगार बुडवते, तर कोणी खोटे आळ टाकून संकटात भर घालते. खिशात कवडी नाही, मात्र तरीही उद्याची भ्रांत नाही.
आकाशातले तारे मोजत गाढ झोप घ्यायची. दुपारी, रात्री निवांत पत्ते खेळायचे. हे पाहिल्यावर मग प्रश्न पडतो की, पत्ते खेळायला यांच्याकडे पैसा येतो कुठून. प्रश्न पैशाचा नसतोच. चिंतेचाही नसतो. मानसिकतेचा असतो. मनी ‘समाधान’ असेल ना तर रस्त्यावरच्या संसारातील आनंद मिळवता येतो. मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या ‘या’ समाजाच्या जगण्याचे कदाचित हेच बळ असावे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…