मुंबई : रवींद्र नाट्य मंदिर (Ravindra Natya Mandir) आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात यापुढे नाटकांच्या प्रयोगांबरोबरच चित्रपटही प्रदर्शित केले जाणार आहेत. ज्या थिएटरमध्ये नाटकाचे प्रयोग होतात तिथेच अत्याधुनिक पडदा लावून चित्रपटाचेही खेळ होणार आहेत. सिने-नाट्यगृह अशा स्वरुपाचे, अत्युच्च दर्जाची ध्वनियंत्रणा असलेले थिएटर या संकुलात तयार करण्यात आले आहे.
नूतनीकरण केलेल्या या वास्तूमध्ये मराठी चित्रपटांसाठी ‘मॅटिनी शो’ राखीव ठेवण्यात येणार आहेत. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. नूतनीकरण केलेल्या वास्तूमध्ये अनेक नवनवीन दालने, अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. या संकुलाचे रुपडे पूर्णत: पालटले आहे. अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत हे संकुल पुन्हा एकदा कलाकृती आणि कलाकारांनी गजबजणार आहे.