मुंबई : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली.
सभागृहात गदारोळ वाढल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं. पण विरोधकांना एवढंच सांगेन की सध्या हा विषय कोर्टात आहे. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर या विषयावर सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील; असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे राजकीय भवितव्य संकटात ? काय घडलं कोर्टात ?
नेमके काय झाले ?
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीची सदनिका मिळवताना शासनाची फसवणूक करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार दोन वर्षाची शिक्षा झाल्यास माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद तसेच त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. हे संकट टाळण्यासाठी कोकाटेंनी न्यायालयात दाद मागितली आहे. कोर्टाने अद्याप निर्णय दिलेला नाही. पण निर्णय कोकाटेंच्या विरोधात गेला तर त्यांना आमदारकी गमवावी लागेल. कोर्टाने कोकाटे प्रकरणी पुढील सुनावणी पाच मार्च रोजी घेणार असल्याचे सांगितले.