अलिबाग तालुक्यातील नवखार उर्फ डावली रांजणखार गावचा पाणीप्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित
अलिबाग : काळे झेंडे हातात घेत जिल्हा प्रशासनास निषेध (Protest) करीत आणि रिकामा हंडा भरलेला पाहिजे… कोण म्हणतो देणार नाय… घेतल्याशिवाय राहणार नाही… आश्वासन नको, कृती हवी… ठेकेदार रोहीत पाटील हाय-हाय… अशा विविध प्रकारच्या घोषणा देत आज भरदुपारी अलिबाग तालुक्यातील डावली-रांजणखार येथील महिलांसह पुरुष ग्रामस्थांचा भव्य हंडामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता.
माजी सरपंच हेमंत पाटील, दर्शना पाटील, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील, हरिश्चंद्र आपटे आदींच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
IIT BABA Arrested : ‘आयआयटी बाबा’ला पोलिसांकडून अटक, ड्रग्जही सापडले
अलिबाग एसटी आगारापासून या मोर्चाला सुरवात झाल्यानंतर मोर्चाने अलिबाग जुनी नगरपालिका, बालाजी नाका, मारुती नाका, स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा पोलिस मुख्यालयमार्गे मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कुच केली असतनाच अलिबाग पोलिसांनी मोर्चाला हिराकोट तळ्याजवळ अडविले. तेथेही मोर्चेकरांनी जिल्हा प्रशासन व ठेकेदार रोहित पाटील आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाट यांच्या विरोधात विविध प्रकारच्या घोषणा देत श्री. बास्टेवाड हे ठेकेदार रोहित पाटील याला अभय देत देत असल्याचा आरोप केला. तसेच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मोर्चाला सामोरे यावे अशी आग्रही मागणी केली. त्यावर जिल्हा प्रशासनातील कोठलाही अधिकारी मोर्चाला सामोरे न आल्याने मोर्चेकरी संतप्त झाले. यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढत शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घ्यावी असे सांगितले असता, मोर्चेकरी आपल्या मागणीवर ठाम राहत त्यांनी जागीच ठिय्या मारल्याने काहीकाळ वातावरण तप्त झाले होते.
अलिबाग तालुक्यातील नवखार उर्फ डावली रांजणखार हे गाव अगदी समुद्रकिनारी वसलेले आहे. या गावातील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. नवखार गावचा पाणीप्रश्न हा गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. पाणी साठवण टाकी तयार असून, जलवाहिनीचे कामदेखील पूर्णत्वास गेले आहे. वीज मोटारीने पाणी टाकीत चढविण्यासाठी केबिनही बांधली आहे. मात्र या केबिनमध्ये वीज मोटारच बसविली नसल्याने ग्रामस्थांना नियमीत पाणी पुरवठाच होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. परिणामी गावकरी विकतचे पाणी घेऊन आपली तहान भागवीत आहेत. गावकऱ्यांनी यापूर्वी देखील पाण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी केवळ आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात पाणी मिळालेच नाही. त्यामुळेच त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी आज निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात काळे झेंडे घेत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हंडामोर्चा काढला होता.
डावली-रांजणखार हद्दीतील पाणीप्रश्न कायमचा सुटण्यासाठी मागिल सरकारमध्ये जलजीवन मिशन योजनेंतर्गत रांजणखार-डावली गावासाठी १ कोटी १४ लाखाची योजना राबविताना सारळ घोळ येथे नविन विहीर बांधून त्यातून या गावासाठी पाणी देण्याचे ठरले होते. मात्र त्यातून आजतागायत पिण्याचे पाणी ग्रामस्थांपर्यंत पोचलेच नसल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी व्याकुळ झाले आहेत. रायगड परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी या गावाला २०२३ मध्ये भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी तीन महिन्यात पाणीप्रश्न सोडवितो असे आश्वासनही ग्रामस्थांना दिले होते. मात्र हेही आश्वासन हवेतच विरले आहे. या योजनेचे पाणी इतर गावांतील धनदांडगे, उद्योगपती यांच्या बंगल्यांना देण्यात येत असून, ज्या गावांसाठी योजना राबविली त्या गावांना या योजनेचे पाणी मिळत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.