Sunday, June 15, 2025

Government Medical College : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभारणार स्वतंत्र पोलीस चौकी

Government Medical College : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभारणार स्वतंत्र पोलीस चौकी

मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्वतंत्र पोलीस चौकी उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभाग आणि गृह विभाग यांच्यात प्राथमिक चर्चा सुरू आहे. निवासी डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले ही वैद्यकीय शिक्षण विभागासमोर एक मोठी समस्या आहे. कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला निवासी डॉक्टरच्या हत्येनंतर देशभरात निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. कोलकाता घटनेची पुनरावृत्ती राज्यात होऊ नये यासाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी केली होती. त्याची गंभीर दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यासंदर्भातील आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.



नुकतेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही विशेष बैठक घेऊन प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करण्याच्या सूचना विभागाला दिल्या. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोलिस चौकी उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी रुग्णालयांमध्ये अलार्म यंत्रणेबरोबरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी केली होती. त्यादृष्टीने विभागाने कामही सुरू केले आहे. डॉक्टरांना रात्रीच्या वेळी वसतिगृहात जावे लागू नये, यासाठी रुग्ण कक्षाशेजारी निवासी डॉक्टरांसाठी स्वतंत्र कक्ष बनविण्याची योजनाही आखण्यात आली आहे.सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्थानिक पोलिसांकडून नियमित गस्तही असायला हवी. यासोबतच प्रत्येक प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. हे कॅमेरे स्थानिक पोलीस ठाणे किंवा रुग्णालयाच्या सुरक्षा विभागाशी जोडले जावेत, जेणेकरून सुरक्षा कर्मचारी डॉक्टरांपर्यंत वेळेत पोहोचू शकतील आणि त्यांना वाचवता येईल. याशिवाय रुग्णालयातील रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी पास प्रणालीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे निवासी डाॅक्टरांकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment