पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये (Swargate Bus Depo) मंगळवारी (२५ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला ७० तासांनंतर अटक करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीची घटना समोर आली. या वाढत्या घटनांवर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आज माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “महाराष्ट्रात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः महिलांवरील अत्याचारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. चाकणमध्ये पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाला. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाली आणि स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर अत्याचार झाला. या सर्व घटना गंभीर असून, त्याचा मी तीव्र निषेध करते. महिलांची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची आहे, मात्र राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.”
Eknath Shinde : अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची एकनाथ शिंदेंची मागणी
“अत्याचारासारख्या घटनांसाठी कठोर शिक्षा आवश्यक”
सुळे (Supriya Sule) पुढे म्हणाल्या, “स्वारगेटसारख्या घटना सातत्याने घडत आहेत, जे अत्यंत दुर्दैवी आहे. ही घटना अंधारात, कोपऱ्यात नाही, तर एका सार्वजनिक ठिकाणी घडली. पीडित मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली. समाजाने महिलांवरील कोणत्याही अत्याचाराचा जाहीर निषेध केला पाहिजे.”
याआधी बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवेळीही त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती की, “महाराष्ट्राने संपूर्ण देशासमोर उदाहरण निर्माण करावे. बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांमध्ये खटले चालवून आरोपींना भरचौकात फाशी द्यावी.” त्यांनी पुन्हा एकदा हीच मागणी केली आहे.
सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणावर सुरुवातीला डीसीपींनी सांगितले होते की, पीडित तरुणीने ओरडले नाही. तर गृहराज्यमंत्री म्हणाले होते की, तरुणीने संघर्ष केला नाही. या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “हे धक्कादायक आहे. मी महाराष्ट्र सरकारला विचारते— तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींविषयी इतकी आत्मीयता दाखवता, मग स्वारगेट प्रकरणात सरकारने दिलेलं वक्तव्य योग्य आहे का? पदावर असणाऱ्या व्यक्तींनी जबाबदारीने बोलले पाहिजे आणि संवेदनशीलता दाखवली पाहिजे.”