Tuesday, July 1, 2025

Eknath Shinde : अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची एकनाथ शिंदेंची मागणी

Eknath Shinde : अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची एकनाथ शिंदेंची मागणी

मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी उधळलेल्या मुक्ताफळांवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ज्याने संभाजीराजांना हाल हाल करून मारले, हिंदूंची मंदिरं तोडली असा औरंगजेब हा चांगला शासक कसा असू शकतो? असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विचारला. औरंगजेब हा महापापी होता, त्याला चांगला म्हणणाऱ्या अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असेही ते म्हणाले.


छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरमुळे वातावरण आधीच तापले आहे. अशातच आता सपाचे आमदार अबू आझमी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, त्याच्या काळात भारताची जीडीपी सर्वात जास्त होता. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये धर्माची लढाई नव्हती असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे. देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे असेही ते म्हणाले. अबू आझमींच्या या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.



एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, चाळीस दिवस संभाजीराजेंना हाल करुन मारले. त्यांचा अपमान केला, अत्याचार केला. अशा अत्याचार केलेल्या औरंग्याला चांगले म्हणणे हे दुर्दैवी आहे. त्याने हिंदूंची मंदिरं तोडली. त्याने गरिबांना लुटले. आया-बहिणींवर अत्याचार केले. त्याने अनेकांना धर्मपरिवर्तन करायला लावलं. असा व्यक्ती चांगला प्रशासक होऊ शकतो? औरंगजेब महापापी होता. अबू आझमींनी राष्ट्रपुरुष, देशभक्तांचा अपमान केला. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली.


भाजपाचे आमदार राम कदम यांनी अबू आझमींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अबू आझमी यांना इतिहास माहिती नाही. त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे. उद्या ते सभागृहात येतील तेव्हा मी त्यांना इतिहासाचे पुस्तक देणार आहे, असे राम कदम यांनी म्हटले.


औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना कशाप्रकारे कैदेत ठेवले, त्यांचा कशाप्रकारे अनन्वित छळ केला, हे अबू आझमी यांना माहिती नाही का, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला.

Comments
Add Comment