दुबई: वरूण चक्रवर्तीने मारलेल्या जोरदार पंचमुळे भारताने न्यूझीलंडला हरवले आहे. यासोबतच सेमीफायनलमध्ये आता भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २५० धावांचे आव्हान दिले होते. मात्र वरूणच्या माऱ्यासमोर किवी संघ पूर्णपणे ढेपाळला. वरूणच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडला केवळ २०५ धावाच करता आल्या आणि न्यूझीलंड संघाचा ४४ धावांनी पराभव झाला.
या सामन्यात केन विल्यमसन्सने ८१ धावांची खेळी करत संघाला पराभवापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला इतर कोणाचीही अपेक्षित साथ न लाभल्याने न्यूझीलंडचा पराभव झाला.वरूणने या संपूर्ण सामन्यात ५ विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने २ आणि हार्दिक पांड्या, अक्षऱ पटेल, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २४९ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी फटाफट बाद झाली. त्यानंतर आलेला विराट कोहलीही फ्लॉप ठरला. त्याने केवळ ११ धावा केल्या. भारताने ३० धावांमध्ये आपले ३ फलंदाज गमावले होते.
त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांची जोडी क्रीझवर जमली. श्रेयसने ७९ धावा केल्या. तर अक्षर पटेलने ४२ धावांची खेळी केली. लोकेश राहुल २३ धावा करून परतला. हार्दिक पांड्याने ४५ धावा ठोकल्या. रवींद्र जडेजाला १६ धावा करता आल्या. मोहम्मद शमीने ५ धावा केल्या.
भारताने न्यूझीलंडला हरवल्याने ग्रुप एमध्ये भारत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे आता सेमीफायनलमध्ये भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.