पुणे : अन्नसुरक्षा कायद्यानुसार रेशनवर (Ration) पौष्टिक धान्य देण्याची सक्ती सरकारने केली असली, तरीही सर्व सामान्य गोरगरीबांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये सिमेंटमिश्रित तांदूळ मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार धनकवडी येथील जे.पी. प्रजापती या स्वस्त धान्य दुकानात उघडकीस आला आहे. वजन वाढविण्यासाठी सामान्य माणसांच्या जिवाशी सुरू असलेल्या या खेळावर कुणाचेच नियंत्रण नाही का, सरकारी यंत्रणा झोपलेली आहे का, ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. (Pune News)
पुणे शहरासह उपनगरातील लाखोंच्या संख्येने असलेले गोर गरीब नागरिक रेशनिंगवर अवलंबून आहेत. सरकारी स्वस्त धान्य दुकानामार्फत महाराष्ट्र सरकारकडून अंत्योदय, बीपीएल धारकांना दरमहा धान्यांचा पुरवठा केला जातो. यात तांदूळ, गहू व साखरेचा समावेश आहे. अन्नसुरक्षा कायद्या नुसार रेशनवर पौष्टिक धान्य देण्याची सक्ती सरकारला केलेली आहे. तरी सुद्धा गरिबांना हक्काचे चांगले धान्य देण्याऐवजी निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले जात आहे.
धनकवडी परिसरातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये सिमेंट मिश्रित तांदूळ आणि गहू येत असल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आल्यानंतर संपूर्ण शहरातील स्वस्त धान्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून हा संपूर्ण शहराचा प्रश्न असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. दर महिन्याला अनेक खराब पोती अशीच असतात. सोनकिडे, मोठे खडे, कचरा मोठ्या प्रमाणावर येत आहे. माल चांगला येत नाही म्हणून मी राजीनामा देण्याचा मानसिकतेत आहे, तब्बल पंधरा पोती खराब असल्याचा दावा दुकानदाराने केला आहे.
निकृष्ठ दर्जाच्या धान्यामुळे सर्वसामान्य संतप्त
संतप्त नागरिकांनी दुकानदाराला सिमेंट मिश्रित तांदूळ दाखवत हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे सांगितले, सिमेंट गोदाम आणि धान्य गोदाम एकत्रित आहेत त्यामुळे असा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. सिमेंट आणि खाद्यान्न एकच गोदामात ठेवत असतील तर. रेशनचे खानाऱ्या नागरिकांना काही दिले तरी चालते? ही मानसिकता गंभीर असल्याचे आणि अशा प्रकारे निकृष्ठ अन्न खावे लागत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या हक्काचे उल्लंघन करण्यात येत असून याची चौकशी करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे यांनी केली आहे. त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनास संपर्क साधून घटनेची माहिती दिली. धान्यामध्ये प्रचंड कचरा, खडे, माती दिसून येत असून तांदळात तर सिमेंट मिश्रीत तांदुळ आल्याची ओरड सर्वसामान्य करत आहेत. अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असल्याने सर्वसामान्यात संताप व्यक्त केला जात आहे.