नवी दिल्ली : यंदा मार्च महिन्यात इतर वर्षांच्या तुलनेत अधिक उष्णतेची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने आज, शुक्रवारी दिली. भारतीय हवामान विभागाने या वर्षीतील मार्च महिना सर्वात उष्ण असणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिवसाचे तापमान वाढण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर अनेक राज्यांमध्ये महिन्याच्या अखेरीस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस (१०४° फॅरेनहाइट) पेक्षा जास्त होण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्यांने सांगितले.
उत्तर आणि मध्य भारतातील गहू उत्पादक राज्यांमध्ये मार्चच्या मध्यापासून तापमानात तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे. सामान्यपेक्षा ६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चमधील हवामान गहू, हरभरा आणि रेपसीड पिकांसाठी अनुकूल राहणार नाही, कारण त्यांना उष्णतेच्या ताणाचा सामना करावा लागू शकतो इशारा त्यांनी दिला. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान लागवड केलेली ही हिवाळी पिके त्यांच्या वाढीच्या चक्रात थंड तापमानावर अवलंबून असतात आणि त्यामुळे चांगले उत्पादन मिळते.
Eknath Shinde : इडीची पिडा पाठी लागलेल्या अधिकाऱ्यावर उपमुख्यमंत्री संतापले!
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश म्हणून, २०२२ पासून सलग ३ वर्षे खराब पीक घेतल्यानंतर महागड्या आयातीची गरज टाळण्यासाठी भारत २०२५ मध्ये भरपूर पीक घेण्याची आशा करत आहे. तथापि, जास्त उष्णतेमुळे सलग चौथ्या वर्षी उत्पादन कमी होऊ शकते, ज्यामुळे सरकार आयातीला परवानगी देण्यासाठी आणि पुरवठ्याची कमतरता कमी करण्यासाठी विद्यमान ४० टक्के आयात कर कमी करू शकते अथवा तो हटवू शकते.