पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील २६ वर्षीय युवतीवरील अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खळबळ उडाली आहे. मुळात साडेपाच वाजता ही घटना एसटी स्थानक आवारातील उभ्या असलेल्या बसमध्ये घडत असताना तेथील सुरक्षा यंत्रणा काय करत होती? यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहाटे एसटी पकडण्यासाठी २६ वर्षीय तरुणी एसटी स्थानकात येते काय, कोणीतरी भूलथापा मारून बंद असलेल्या बसमध्ये घेऊन जाते काय? बसमध्ये जाताच त्या महिलेवर अत्याचार करून तो नराधम त्या परिसरातून बिनधास्तपणे निघून जातो काय? या सर्वच घटना अविश्वसनीय असून मनामध्ये संताप निर्माण करणाऱ्या आहेत. त्याहून संतापजनक बाब म्हणजे त्या भागातील राजकीय नेतृत्व असलेल्या वसंत मोरे यांनी तेथे तोडफोड केल्यावर एसटी स्थानक आवारात बस असलेल्या बसेसची पाहणी केल्यावर त्यात कंडोम व अन्य साहित्य पडलेले पाहून डोके सुन्न होते. या तरुणीने पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे धाडस दाखविले म्हणून ही घटना उजेडात आली आहे. अनेकदा इज्जतीच्या भीतीने, समाज काय म्हणेल, समाज कोणत्या नजरेने पाहील या भीतीने अत्याचार झालेल्या महिला, युवती, शालेय मुली या घटना कोणाला सांगत नाही? त्यातूनच या नराधमांचे फावते आणि अशा अमानुष घटनांवर पडदा पडला जातो व त्यातूनच त्यांचे धाडस वाढीला लागते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीरपणे दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याने या घटनेतील सत्य लवकरच उजेडात येईल. नराधम सापडेल, नराधमाला शिक्षाही होईल. पण काळ सोकावेल, याचे उत्तर कोणी देऊ शकेल काय? त्या पीडित युवतीला त्या धक्क्यातून आयुष्यभर सावरता येणार नाही. राज्य सरकारच्या एसटी स्थानकामध्ये महिला, मुली, युवती आता सुरक्षित राहिल्या नसल्याचा संदेश आता राज्याच्या कानाकोपऱ्यात गेला आहे. यातून राज्य सरकारची नाचक्की झाली असून राज्याची प्रतिमाही मलीन झाली आहे. या घटनेमुळे स्वारगेट एसटी स्थानकातील सुरक्षेबाबत टाहो फोडला जात असतानाच या प्रकरणात पोलिसांच्या निष्काळजीपणाचा कोणताही भाग नाही. पोलिसांनी वेळच्या वेळी गस्त घातली होती. मात्र एसटी महामंडळाने नियुक्त केलेली खासगी सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्याचे उघड झाले आहे. तपासादरम्यान समोर आले की, घटनेच्या दिवशी रात्री १२ ते पहाटे ६ या वेळेत पोलिसांनी दोन वेळा गस्त घातली होती. रात्री १:३० वाजता आणि पुन्हा पहाटे ३ वाजता पोलीस निरीक्षकांनी बसस्थानकावर गस्त घातली होती. ही सर्व बाब सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्पष्ट दिसून येते. त्यामुळे पोलिसांनी आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडले आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे.
एसटी महामंडळाने एका खासगी सुरक्षा एजन्सीला हे काम सोपवले होते; परंतु त्या एजन्सीच्या सुरक्षारक्षकांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही. जर त्यांनी जागरूकता दाखवली असती, तर ही घटना टाळता आली असती; परंतु खासगी एजन्सीवर घडल्या घटनेचे खापर फोडून राज्य सरकारला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. कारण खासगी सुरक्षा यंत्रणा योग्य प्रकारे काम करतेय का, याची जबाबदारी डेपो व्यवस्थापकावर होती. मात्र, त्यांनी हे काम योग्य प्रकारे पाहिले नाही. त्यामुळेच या घटनेला वाव मिळाला. घटनास्थळी १०-१५ लोक उपस्थित होते, पण कुणालाही संशय आला नाही. त्यामुळेच आरोपीने गुन्हा केला. या घटनेला पोलिसांनी दुर्लक्ष केलेले नाही. पोलिसांची जबाबदारी वेगळी आहे आणि एसटी स्टँड परिसराची सुरक्षा एसटी महामंडळ आणि खासगी सुरक्षा यंत्रणेवर अवलंबून आहे. त्यामुळे घडल्या घटनेबाबत सरकार पोलिसांची बाजू घेत असले तरी एसटी डेपो कर्मचारी ही राज्य सरकारच्या अखत्यारीतील बाब आहे. घटना घडल्यावर राज्य सरकार व गृह यंत्रणेकडून कमालीची सतर्कता दाखविली जात असली तरी ही सतर्कता यापूर्वीच दाखविली असती, तर अशा अमानुष घटना करण्याचे नराधमांचे धाडसच झाले नसते. एसटी स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाहीतला आरोपी सराईत गुन्हेगार होता, त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर आहे. त्याचा शोध घेण्याकरता पुणे पोलिसांनी १ लाखांचेही बक्षीस जाहीर केले असून त्याच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात स्वारगेट स्थानकात तैनात असलेल्या २३ सुरक्षा रक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. २०२० मध्ये या नराधमाने करे घाटात लूटमार केली होती. दरोड्या प्रकरणी त्याला शिक्षाही झाली होती. त्याच्यावर शिक्रापूरमध्ये दोन, अहिल्यानगरमध्ये सुपा, केडगाव आणि कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. घटना घडल्यावर राजकीय घटकांनी ज्यावेळी एसटी स्थानकामध्ये तोडफोड केली, त्यावेळी एसटी स्थानकामध्ये बसेसजवळ सुरक्षा रक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट बसस्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेले निदर्शनास आले. मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे, याबाबतही जनसामान्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे युवतीवर अत्याचार करून नराधम आपल्या गावी गेला, गावी जाऊन कीर्तनात सहभागी झाला, दुपारनंतर घटना, आरोपीचे नाव आणि फोटो प्रसिद्धीस येऊ लागल्यावर त्या नराधमाने गावातून पलायन केले. नराधम किती निर्ढावलेला आहे, हे यातून दिसून येत आहे. केलेल्या कृत्याबाबत नराधमाला कोणताही पश्चाताप नसून तो राजरोसपणे काही वेळ सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, जनसामान्यांमध्ये वावरत होता. त्यामुळे अशा निर्ढावलेल्या अपप्रवृत्ती जनसामान्यांमध्ये मोकळेपणाने फिरणे हे प्रचलित समाजव्यवस्थेसाठी घातक असून महिला, मुली यांच्यासाठी ती धोकादायक बाब आहे. या गुन्हेगारांचा तातडीने शोध लावून त्यास फासावर चढविणेच संयक्तिक ठरणार आहे.अशा नराधमांना कठोर शासन केल्याशिवाय अशा घटनांना पायबंद लागणार नाही व नराधमांनाही वेसन बसणार नाही. घडल्या घटनेने बस स्थानकातील सुरक्षेचे धिंडवडे निघाले असले तरी युवतीनेदेखील अनोळखी व्यक्तीच्या संभाषणावर विश्वास ठेवणे चुकीचेच होते. या चुकीची तिलाही फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे.
घडली घटना समाजव्यवस्थेसाठी कलंक आहे. एसटी स्थानके रात्री , अपरात्री, पहाटे उजेडी महिलांसाठी, मुलींसाठी सुरक्षित नसल्याचे चित्र या घटनेतून निर्माण झाले आहे. नराधमाला धडा शिकवावा लागेल. सर्वसामान्य जनतेनेही यापुढे बघ्याच्या भूमिकेचा त्याग करून घडणाऱ्या घटनांबाबत जागरुकता दाखविली पाहिजे. स्थानकामध्ये असलेल्या १०-१५ जणांनी जरी मुलगी बंद गाडीकडे का जात आहे, याची उत्सुकता दाखवत मुलीसोबत गेले असते, तर कदाचित आज वेगळे चित्र पाहावयास मिळाले असते. घटना घडल्यावर हळहळ अथवा संताप व्यक्त न करता घटना घडण्यापूर्वी जागरुकता दाखविली, तर येत्या काळात संताप व्यक्त करण्याची वेळ कोणावरही येणार नाही.