अनेक जागतिक विक्रम मोडून नोंदवले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव
प्रयागराज : प्रयागराज येथे ४५ दिवस चालणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि आध्यात्मिक मेळाव्याचा महाकुंभाचा समारोप महाशिवरात्रीच्या निमित्ताने झाला. या अभूतपूर्व ४५ दिवसांच्या कार्यक्रमाची जगभरात चर्चा होत आहे. यापूर्वी जगभरातील कोणीही कोठेही कधीही श्रद्धेचा इतका महासागर पाहिलेला नाही. ४५ दिवसांत ६६ कोटी ३० लाखांहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले. दररोज १.२५ कोटींहून अधिक भाविक पवित्र स्नान करत होते. या महाकुंभमेळ्याला ५० लाखांहून अधिक परदेशी भाविक आले. तसेच, ७० हून अधिक देशांतील लोक प्रयागराजला पोहोचले. तथापी, अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट आणि जगभरातील १०० हून अधिक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांनी प्रयागराजला भेट दिली.
हाताने रंगवण्याचा नवा विक्रम
सनातन संस्कृतीच्या दिव्य तेजाने उजळलेल्या या भव्य कार्यक्रमाने एकाच वेळी नदी स्वच्छ करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांचा, एकाच ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता करणाऱ्या कामगारांचा आणि ८ तासांत हाताने रंगवणाऱ्या जास्तीत जास्त लोकांचा विक्रम ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंदवून एक नवा इतिहास रचला गेला. महाकुंभात हस्तकला क्षेत्रातही एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. या रेकॉर्डमध्ये एकूण १०,१०२ लोकांनी एकत्रितपणे रंगकाम केले होते. यापूर्वीचा रेकॉर्ड ७,६६० जणांचा होता.
झाडू लावण्याचा रेकॉर्ड
- या स्वच्छ मोहिमेत एक नवीन टप्पाही नोंदवण्यात आला १९ हजार लोकांनी एकत्र झाडू लावून स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पार पाडली. यापूर्वी हा विक्रम १० हजार लोकांनी केला होता. हे अभियान समाजात स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करतेच, शिवाय सामूहिक प्रयत्नांची शक्तीदेखील दर्शवते. या नोंदींसाठी प्रमाणपत्रे आज संबंधित अधिकाऱ्यांनी प्रदान केली आणि या कामगिरीबद्दल सर्व सहभागींचे अभिनंदन करण्यात आले. हे सर्व उपक्रम समाजाला स्वच्छतेचे आणि सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व समजावून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सिद्ध होत आहे.
- दरम्यान, मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीमुळे महाकुंभाची प्रतिमा थोडीशी मलिन झाली; परंतु या घटनेचा भाविकांच्या श्रद्धेवर फारसा परिणाम झाला नाही. महाकुंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, स्टार्स आणि क्रीडा आणि उद्योग जगतातील व्यक्तिमत्त्वांपर्यंत, सर्वांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. तथापी, अनेकांनी योदी सरकारने केलेल्या व्यवस्थेचे कौतुक केले.
गंगा स्वच्छतेचा नवा विक्रम
महाकुंभात गंगा स्वच्छता मोहिमेअंतर्गत एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. ३६० लोकांच्या टीमने चार वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी एकत्र काम केले आणि ही एक नवीन कामगिरी बनली आहे. पूर्वी अशा स्वच्छता मोहिमांमध्ये कमी संख्येने लोक सहभागी होते; परंतु आता ही संख्या ३६० पर्यंत पोहोचली आहे.