बार्शी : ढाळे पिंपळगाव तलावातील दोघांच्या मृत्यू प्रकरणातील खरे सत्य पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. प्रेयसीच्या पतीला उचलून तलावात फेकताना त्याने त्याचा गळा धरला आणि प्रियकरही पाण्यात बुडून मरण पावल्याची कबुली साक्षीदाराने पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पांगरी पोलिसांनी मयत गणेश अनिल सपाटे (वय २६, रा. अलीपूर रोड, बार्शी) आणि रूपाली शंकर पटाडे (वय ३५) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच महिलेला अटक केली आहे.
महागाव (ता. बार्शी) येथील ढाळे पिपळगाव तलावात पुलावरून पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली होती. त्या दोघांचा मृत्यू संशयास्पद होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पांगरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली होती.
भाच्याच्या लग्नात भाडोत्री बायका नाचवणा-या मामाला पोलिसांचा दणका!
तपासादरम्यान, साक्षीदार गणेश खरात याने काही महत्त्वाच्या बाबींचा खुलासा केला. गणेश सपाटे व साक्षीदार गणेश खरात हे मित्र होते. सपाटे याने या मित्रापुढे नातेवाइकाच्या पत्नीसोबत संबंध असल्याचे सांगून तिचा नवरा अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट केले होते. त्याला ठार मारण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती.
गणेश सपाटे, त्याचा मित्र गणेश खरात आणि शंकर पटाडे हे तिघे मिळून दारू पार्टीसाठी बार्शी तुळजापूर रोडवरून बावीच्या पुढे गेले. रात्रीच्या वेळी तिघेजण ढाळे पिपळगाव तलावाच्या पुलावर पोहोचले. तेथे ते पुलावर गप्पा मारत असताना संधी साधून गणेश सपाटे याने शंकर पटाडे याला उचलले आणि पुलावरुन तलावात फेकले. परंतू त्याचवेळी शंकर पटाडे याने गणेशच्या मानेला घट्ट पकडून ठेवले होते. त्यामुळे तो देखिल पुलावरुन खाली पडला. त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. परंतू पोलिसांनी त्यांचा मित्र असलेल्या गणेश खरात याची कसून चौकशी केली असता सदर प्रकार उघडकीस आला.