नवरदेव, मामा, डीजेवाला, ट्रॅक्टर चालकासह ५ जणांविरुद्ध गुन्हा
सोलापूर : भाच्याचे लग्न धूमधडाक्यात लावण्याच्या नादात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मामाला लग्नात विनापरवाना डीजे लावणे आणि भाडोत्री महिलांना नाचविण्याचा प्रकार चांगलाच अंगलट आला आहे.
मामा रवी रामसिंग मैनावाले, नवरदेव शुभम गणेश फटफटवाले यांच्यासह पाच जणांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत वरातीत लावलेला डीजे देखिल जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी सांगितले.
रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास नवनीत हॉस्पिटल ते वनशितला देवी मंदिर (कंकूबाई हॉस्पिटलमागे) या रोडवर डीजेच्या मोठ्या आवाजात हा नृत्याचा प्रकार सुरू होता.
काहीजण दुचाकी गाड्यांचा रेस करीत होते. त्यातच हुल्लडबाजी देखील सुरू होती. त्यामुळे वैतागून काही नागरिकांनी थेट पोलीस उपायुक्तांना फोन केला आणि सदर बझार पोलिसांच्या कानावर तो आवाज पडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा प्रकार थांबविला.