फॅमिली काऊन्सलिंग – मीनाक्षी जगदाळे
आजकाल आपण बघतो की, आपल्या कुटुंबात, समाजात, आजूबाजूला एकमेकांबद्दल जळाऊ वृत्ती झपाट्याने वाढते आहे. घरातील व्यक्ती असो, नात्यातील असो, मित्र-मैत्रीण असो एकमेकांना प्रोत्साहन देणे, उत्तेजित करणे यापेक्षा त्याच्यावर जळताना दिसतात. मानस शास्त्रात अशा प्रवृत्तीला एन्वी म्हणून संबोधले जाते. एन्वी ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. सतत इतरांबद्दल मनात मत्सर, असुया, चुकीची भावना ठेवणारे लोकं एन्वी म्हणजेच दुसऱ्यावर जळणारे या मानस शास्त्रीय संकल्पनेत मोडतात. प्रत्येकामध्ये काहींना काही चांगले गुण, कला, छंद वेगळेपणा असतो. प्रत्येक जण स्वतःमधील चांगलं बाहेर आणण्यासाठी, त्याचं कौतुक होण्यासाठी, त्या गोष्टीला नावलौकिक प्राप्त होण्यासाठी खूप मेहनत घेत असतो, झटत असतो. सातत्याने प्रयत्न करून, नित्य नवीन शिकून आपले स्थान निर्माण करत असतो.
व्यक्ती कोणीही असो जेव्हा ती प्रचंड मेहनत घेऊन काही करते तेव्हा तिला दाद महत्वाची असते. घरातून, समाजातून, लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित असतो. आपल्याला शाबासकी मिळावी, आपल्या कष्टाचे चीज व्हावे, आपल्याला नावाजावे, आपल्या कामाची दखल घेतली जावी असे प्रत्येकाला वाटत असते. अनेक घरात, समाजात, खूप ठिकाणी असे वातावरण पाहायला मिळत की, जी व्यक्ती चांगलं काही करते आहे, पुढे जात आहे, जिला नावे लौकिक मिळत आहे, जी प्रगती करत आहे तिला त्याच्या जवळचे लोक नावे ठेवतात. त्याच्या कामाबद्दल, यशाबद्दल मनमोकळे कौतुक तर करत नाहीच उलट त्याच्या कार्यावर टीकाटिप्पणी करण्यात, त्याला ना उमेद करण्यात लोकं पुढे असतात. त्याला चांगली प्रतिक्रिया द्यायला तर कोणी पुढे येत नाही पण त्याला वाईट वाटेल, त्याला त्रास होईल, दुःख होईल, त्याचा कामातील आनंद निघून जाईल, त्याचे खच्चीकरण होईल अशी वागणूक दिली जाते.
अनेकदा घरातील, समाजातील लोक चांगले काम, चांगले उपक्रम, नोकरी, उद्योग, व्यवसाय अथवा करिअर करणाऱ्यांची स्तुती अथवा कौतुक न करता, त्यांना उभारी न देता त्यांच्यावर जळण्याचे, त्यांचा दुस्वास करण्याचे प्रमाण, त्यांना ना उमेद करून मागे खेचण्याचे प्रयत्न करताना जास्त दिसतात. आपल्याच जवळचे लोक जेव्हा आपल्यावर जळतात, आपल्या कामाबद्दल अपशब्द वापरतात, आपल्या कर्तृत्वाला नावे ठेवतात, आपल्या माघारी आपल्या कामाची अवहेलना अथवा अपमान करतात तेव्हा अतिशय खंत वाटते. अशा स्वभावाची लोक फक्त कार्य कर्तृत्वावर जळत नाहीत तर तुमच्या व्यक्तिमत्त्वावर, बुद्धिमत्ता, तुमचे नावलौकिक, प्रसिद्धी, तुमचे दिसणे, राहणे, वागणे, तुमची प्रतिष्ठा या सगळ्यांवरच जळतात. तुमच्यातील चांगल्या गुणांची ते कधीच कदर करत नाहीत, तुम्हाला किंमत, आदर देत नाहीत तर उलटपक्षी तुम्हाला जितके अपमानित करता येईल, तुमची जितकी जास्त बदनामी करता येईल तितकी ते करतात. तुमच्या कामावर चुकीची शेरेबाजी करणे, खालच्या दर्जाचे भाष्य करणे, चार-चौघात तुमच्या कामावरून तुम्हाला टोमणे मारणे, टीका करणे आणि तुम्हाला तुमच्या कामाचा अभिमान वाटण्याऐवजी पस्तावा होईल, तुमचा काम करण्याचा उत्साह नाहीसा होईल अशी परिस्थिती ते निर्माण करतात. अशा प्रकारच्या लोकांमध्ये, त्यांच्या संपर्कात आपण जर कायम राहिलो तर आपला आपल्या कामातील रस, रुची निघून जाते. आपला आत्मविश्वास कमी होतो, आपल्याला मुद्दाम वेगळी वागणूक दिल्यामुळे आपण स्वतःबद्दल चुकीचे विचार करत राहतो. आपल्याच कर्तृत्ववावर आपण संशय घेतो.
खरंतर आपल्या घरात, आजूबाजूला जी कोणी व्यक्ती ज्या कोणत्या कामात हुशार, तरबेज असेल तिच्याकडून शिकण्यासारखे खूप काही असते. जे काही वेगळे आहे, नवीन आहे, जे ज्ञान, माहिती, अनुभव आपल्याला नाहीत ते नक्कीच दुसऱ्याकडून घेणे अपेक्षित आहे. अत्यंत मोठ्या मनाने समोरच्याची स्तुती करणे, त्यांच्यातील कला, गुण, त्याचे कामे याचा आदर करणे, त्यांच्या मदतीने आपला विकास करणे यासाठी खूप स्वच्छ मानसिकता लागते जी दुर्दैवाने सगळ्यांकडे नसते. दुसऱ्याकडे जे चांगलं आहे, जे घेण्यासारखे आहे ते मोकळेपणाने स्वीकारणे, समोरच्याला मोठेपणा देणे, मानसन्मान देणे त्याची मदत, मार्गदर्शन घेऊन आपण पण पुढे जाणे, प्रगती करणे खूप लोकांना पटत नाही, जमत नाही. स्वतःच्या आयुष्यातील बहुमोल वेळ इतरांवर जळण्यात, इतरांच्या कामाची निंदा करण्यात, इतरांना नमोहरण करण्यात घालवण्यापेक्षा आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो, आपण त्यांच्या सारखी प्रगती करू शकतो का, आपण पण त्यांना साथ देऊन पुढे जावू शकतो का यावर दिला गेला पाहिजे.
दुसऱ्याच्या राहण्यावर, वागण्यावर, व्यक्तिमत्त्वावर जळून त्याचा द्वेष करून त्याचे तर काहीच नुकसान होणारे नसते पण आपण सतत जळण्याच्या भूमिकेत असल्याने, सतत दुसऱ्याबद्दल वाईट बोलण्यामुळे आपली मानसिकता दूषित होते, आपले विचार संकुचित आणि कोते होतात. आपली प्रगती थांबते, अगदी हुशार कर्तृत्वाने मोठा माणूस आपल्याजवळ, आपल्या सान्निध्यात असून सुद्धा आपण वर्षानुवर्षे एकाच जागी राहतो, आपली कोणत्याही स्वरूपाची उन्नती होत नाही, वैचारिक, मानसिक, बौद्धिक बाबतीत आपण खुजेच राहतो. आयुष्यात गेलेली वेळ, गेलेला दिवस, गेलेली वर्ष परत येत नसतात त्यामुळे आपल्याला लाभलेल्या, आपल्या घरात, जवळपास, समाजात असलेल्या चांगल्या लोकांचा उपयोग आपल्याला करून घेता येणे, त्यांच्यासारखे बनण्यासाठी धडपडणे, त्यांचा आदर्श ठेवणे, तसं ध्येय ठेवणे आपल्याला जमणे आवश्यक आहे. ज्याच्याकडे जे जे चांगले आहे ते ते घेता आले पाहिजे, शिकता आले पाहिजे. समोरच्याला नावाजल्याने आपण कधीच छोटे होत नसतो. इतरांना मोठेपणा दिल्यामुळे आपले महत्त्व कमी होत नसतं, उलट आपल्या व्यक्तिमत्त्वात, स्वभावात, जडणघडणीत, वागणुकीत खूप चांगली प्रतिभा जागृत होत असते.
समोरच्या माणसाला त्याच्या कामाची स्तुती करून, त्याला पाठिंबा देऊन, त्याची योग्य ती दखल घेऊन आपण मोठे होत असतो, आपल्या मनातील मळभ, नकारात्मक विचार जाऊन आपण आयुष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकतो. ज्याच्याकडे जे चांगलं आहे ते नावाजता आले पाहिजे, त्याची स्तुती करून प्रोत्साहन देणे जमले पाहिजे त्याच्याकडून ते आत्मसात करता आले पाहिजे आणि यासाठी आपली मानसिकता खूप संप्पन ठेवणे गरजेचे आहे. खुज्या, कमकुवत, संकुचित, जळाऊ लोक याबाबतीत अत्यंत शूद्र विचाराचे असतात त्यामुळे ते स्वतः कधी मोठे होत नाहीत. असे लोकं कुपमंडूक विचाराचेच राहतात. त्यांना आयुष्यात काहीच नवीन शिकायला, करायला, अनुभवायला मिळत नाही. इतरांवर शेरेबाजी करण्यात, टीका करण्यात त्यांचं आयुष्य निघून जातं पण त्यांना ते लक्षात पण येत नाही. वर्षानुवर्षे ते स्वतःच्या अशा जळाऊ स्वभावात, वागण्यात बदल करत नाहीत, सतत स्वतःच्या अहंकारात, गर्विष्ठ पणात हे लोकं जळतात आणि स्वतःचीच राख करून घेतात. असे लोकं सगळ्यांच्या मनातून उतरतात, त्यांना टाळलं जात, त्यांच्याकडे दुर्लक्ष केला जात. ते कुटुंबातून, समाजातून वेगळे पाडले जातात कारण त्यांनी कधीच कोणाची दखल घेतलेली नसते. सतत इतरांच्या कर्तृत्वावर संशय घेतल्यामुळे, इतरांना तुच्छ लेखल्यामुळे यांना पण कोणाचा आदर मिळत नाही, प्रेम, आदर, आपलेपणा, आपुलकी, सहानुभूती मिळत नाही. असे सातत्याने होत राहिल्याने यांच्यातील जळाऊ वृत्ती, तिरस्काराची भावना अधिकाधिक प्रबळ होत जाते आणि त्यांचे मानसिक आरोग्य बिघडत राहते. त्यामुळे सगळ्यांचा सन्मान करणे, कौतुक करणे, स्तुती करणे, सगळ्यांबद्दल चांगलं चिंतने, सकारात्मक बोलणे, इतरांना आत्मविश्वास वाढवायला मदत करणे, इतरांना मानसिक भावनिक आधार देणे म्हणजेच स्वतःला, स्वतःच्या मानसिक आरोग्याला निरोगी ठेवणे आहे.