पुणे : स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपीचा फोटो समोर आला आहे. दत्तात्रय रामदास गाडे असे त्या नराधमाचे नाव आहे.
पुणे पोलिसांचे पथक आरोपी दत्तात्रय गाडेच्या घरी दाखल झाले आहे. मात्र गाडे घरी नसून तो फरार आहे. पुणे पोलिसांकडून आरोपी खाडे याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. गाडे याच्यावर पुण्यासह शिरूर मध्ये सुद्धा चोरी, हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं सुद्धा गाडेचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या आठ पथकांडून आरोपीचा शोध सुरु आहे.
परिवहन मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्दळीच्या स्वारगेट एसटी स्थानकावर पहाटे साडेपाच वाजता ही धक्कादायक घटना घडली. पोलिस आरोपीच्या मागावर आहेत. पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेटला आली होती. दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या तरुणाने तिला फसवून अंधारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसवले. यानंतर बसचा दरवाजा लावून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकार समोर आल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट स्थानकातील ऑन ड्युटी कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे.आरोपीवर याआधीही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. गजबजलेल्या स्वारगेट स्थानकावर असा धक्कादायक प्रकार समोर आल्याने महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.