लाहोर : पाकिस्तानला आयसीसीच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोरील आव्हानं काही संपण्याचं नाव घेत नाहीत.आता पीसीबीसमोर आणखी नवं आव्हान उभं राहिलं आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील पोलिसांनी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान सोपवण्यात आलेली सुरक्षेची जबाबदारी नाकारली आहे. याप्रकरणी पंजाब पोलीस दलातील १०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. आयसीसी चॅम्पियन्स करंडक २०२५ दरम्यान सुरक्षा कर्तव्य पार पाडण्यास नकार दिल्यामुळे या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.
पंजाब पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान अनेकदा काही पोलीस कर्मचारी कर्तव्यावर हजर राहिले नाहीत. गैरहजेरीचे अनेक प्रकार आढळून आले आहेत. अशा बेजबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. तर, काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. वेगवेगळ्या संघांना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममधून हॉटेल्सकडे जाताना सुरक्षा पुरवण्यासाठी पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र, या पोलिसांपैकी अनेकजण गैरहजर असल्याचं निदर्शनास आलं आहे. तर, काहींनी ही जबाबदारी घेण्यास थेट नकार दिला. या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
नकार देण्याचं कारण काय?
या कारवाईबाबत कोणत्याही प्रकारचं अधिकृत वक्तव्य अथवा निवेदन समोर आलेलं नाही. त्याचबरोबर बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावण्यास नकार का दिला हे देखील समजलेलं नाही. पाकिस्तानमधील काही स्थानिक माध्यमांनी दावा केला आहे की हे पोलीस गेल्या कित्येक महिन्यांपासून सेवा देत आहेत. तसेच चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान त्यांचे कामाचे तास वाढले आहेत, त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. अनेकांना आठवड्याच्या रजा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.