उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आई भराडीचे आशीर्वाद
मसूरे (प्रतिनिधी ): राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दुपारी चार वाजता आंगणेवाडी येथे भेट देत आई भराडीचे आशीर्वाद घेतले.यावेळी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.आंगणेवाडी येथे येऊन आई भराडीचे आशीर्वाद घेतल्यानंतर ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. राज्यातील लाडकी बहीण, लाडका शेतकरी, लाडके जेष्ठ नागरिक या सर्वांच्या जीवनात चांगले दिवस येऊ दे. त्यांची प्रगती होऊ दे आणि हे राज्य पुढे जाऊ दे. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येऊ देत असे आपण देवीकडे साकडे घातल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. खऱ्या शिवसेनेचा मागील १० वर्ष या भागात आमदार नव्हता. आमदार निलेश राणे यांच्या रूपाने खऱ्या शिवसेनेचा आमदार आता मिळाला आहे असे ते म्हणाले.
पर्यटनाला चालना देणारे सरकार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा विभाग ७२० किलोमीटरच्या सागरी किनारपट्टी साठी महत्त्वाचे ठरणार आहे. हे सरकार पर्यटनाला चालना देणारे सरकार आहे. त्यामुळे भविष्यात कोकणचा बॅकलॉग पूर्णपणे संपल्याचे आपल्याला दिसून येईल. आई भराडीचे दर्शन घेऊन लाखो लोक काम करत असतात.आज दर्शनाचा योग जुळून आला. आंगणेवाडी हे सर्वांचे श्रद्धास्थान आहे. देश विदेशातून अनेक भक्त आंगणेवाडी येथे येतात. प्रत्येक जण त्याच्या जीवनात सुखी समृद्धी होतो. या भागातले अनेक प्रश्न आमदार निलेश राणे यांना माहित आहेत. पाण्याचा प्रश्न येत्या बजेटमध्ये पूर्णत्वास जाईल. तसेच लाखो यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये यासाठी आपले प्रयत्न आहेत. महाकुंभामध्ये योगी सरकारने चांगले नियोजन केले. इथल्या यात्रेचे सुद्धा चांगले नियोजन असते.
तीर्थक्षेत्राचा विकास करणे हे आपले कर्तव्य आहे. कोस्टल हायवे चे काम सुद्धा चालू आहे. पुणे -मुंबई एक्सप्रेस हायवे प्रमाणे मुंबई – सिंधुदुर्ग एक्सप्रेस हायवे बनवण्यात येईल. इथल्या लोकांना पर्यटनातून रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न आहेत. कोकणचा बॅकलॉग भरून काढणार आहे. वाहते पाणी अडविण्यासाठी छोटी धरणे बांधण्याचे काम सरकार करेल. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विकास प्राधिकरण काम करतय. असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी आमदार निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक, आमदार किरण सामंत, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आंगणे कुटुंबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, मागील दहा वर्षानंतर हा मतदारसंघ आपल्याकडे आलेला आहे दहा वर्षाचा मोठा बॅकलॉग आहे. इथे तर आमचा आमदार नव्हता, खासदार नव्हता. मागच्या अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब यांनी राज्यात काम केलं आणि सरकार येऊन आमच्यासारखे आमदार झाले. आंगणेवाडी साठी पाण्याचा मोठा विषय असून हे पाणी दीड किलोमीटर अंतरावरून आणायचे आहे. त्यासाठी सुमारे दहा कोटीची गरज आहे. याच बजेटमध्ये यासाठी निधी मंजुरी मिळावी. पुढच्या आंगणेवाडी जत्रे आधी कायमस्वरूपी जिओ टॉवर व्हावा यासाठी आपले प्रयत्न आहेत असे आमदार निलेश राणे म्हणाले.