पुणे : तस्करांनी दुबई ट्रिपसाठी निघालेल्या तीन विद्यार्थ्यांचा वापर करून ट्रॉली बॅगमध्ये लपवून ठेवलेले सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे परकीय चलन पुणे विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाने जप्त केले. या प्रकरणी दोघांना अटक केली असून, त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने १७ फेब्रुवारी रोजी दुबई ट्रिपसाठी निघालेल्या स्पाइस जेटच्या विमानातून दोन ट्रॉली बॅगमध्ये परकीय चलन भारतातून तस्करी केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशांना परत बोलावून घेतले. त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली. अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या सामानातून तीन कोटी ४७ लाख रुपये (सुमारे चार लाख अमेरिकन डॉलर्स) जप्त केले.
चौकशीदरम्यान, विद्यार्थ्यांनी सीमाशुल्क अधिकाऱ्यांना सांगितले की, या बॅगा पुण्यातील ट्रॅव्हल एजंट खुशबू अग्रवाल यांनी दिल्या होत्या. खुशबू अग्रवाल हिने या तीन विद्यार्थ्यांना त्यांच्या दुबई ट्रिपसाठी पॅकेज दिले होते. पुण्याहून निघण्यापूर्वी शेवटच्या क्षणी तिने विद्यार्थ्यांना दोन बॅगा दिल्या. त्यामध्ये कार्यालयीन कागदपत्रे असून, ती दुबईच्या कार्यालयात तातडीने द्यावयाची असल्याचे सांगितले. चांगल्या हेतूने या विद्यार्थ्यांनी बॅगा घेऊन पुण्याहून निघून गेले. परंतु तस्करीची माहिती मिळताच सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अधिकाराचा वापर करून त्या प्रवाशांना दुबईवरून परत बोलावून सामानाची झडती घेतली.