अमरावती : तिवसा शहरात स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याची ही वर्षभरातली दुसरी घटना आहे. यापूर्वी जानेवारी २४ मध्ये म्हणजेच एक वर्षांपूर्वी सुद्धा एटीएम फोडण्यात आले होते. मात्र घटनेला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच आज एटीएम फोडून रक्कम पळविल्यानंतर एटीएम मशीन चोरट्यांनी जाळून टाकली आहे.
चोरट्यांकडून एटीएम फोडून रोकड लंपास केल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहे मात्र अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातील स्टेट बँकेचे एटीएम फोडले नाही तर चक्क मशीन जाळून लाखो रुपये पळविल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आज पहाटे चार वाजताचे सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेचा शोध लागू नये म्हणून चोरट्यांनी आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारून पुरावा देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
अमरावती-नागपूर हायवे वर तिवसा शहर असून अगदी रोडच्या कडेला भारतीय स्टेट बँक आहे.या बँकेचे येथे एटीएम असून या एटीएमच्या आजूबाजूला सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असतानाही अज्ञात चोरट्यांनी बुधवारी पावणेचार वाजता कॅमेरावर स्प्रे मारून सदर एटीएम मशीन फोडली. त्यात कुठलाच पुरावा पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून एटीएम मशीन फोडल्यानंतर अनोखी शक्कल लढवून ती पूर्णतः जाळून टाकली. मात्र त्यापूर्वी लाखोंची मोठी रक्कम चोरट्यांनी पळवून नेल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
मंगळवारच्या मध्यरात्री नंतर आज बुधवारी पहाटे ३ वाजून ४३ मिनिटांनी ही घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपींनी पळ काढला असून काही ग्राहक पैसे काढण्यासाठी एटीएमकडे गेल्यानंतर सदर एटीएम जाळून खाक केल्याची घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात माहिती दिली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सुरू आहे.