पाटणा : बिहारमध्ये आज, बुधवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion in Bihar) झाला. यामध्ये भाजपाच्या ७ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार असल्याने हा विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे.
नीतीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात संजय सरावगी (दरभंगा), डॉ. सुनील कुमार (बिहारशरीफ), जिबेश कुमार (जले), राजू कुमार सिंग (साहेबगंज), मोतीलाल प्रसाद (रीगा), विजय कुमार मंडल (सिक्ती) आणि कृष्ण कुमार मंटू (अमनूर) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
तत्पूर्वी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. मी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे. ‘एक व्यक्ती, एक पद’ हे तत्व पक्षाचे काम करते. केंद्रीय नेतृत्वाने मला पक्षाच्या राज्य युनिटची जबाबदारी दिली आहे याबद्दल मी आभारी आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या बिहारमध्ये मंत्र्यांची संख्या ३० असून यामध्ये भाजपचे १५ आणि संयुक्त जनता दलाचे (जदयू) १३ तर हिंदुस्थानी अवम मोर्चा (एचएएम) एक आणि एक अपक्ष यांचा समावेश आहे. दरम्यान मंत्रिमंडळात ६ जागा रिक्त आहेत. येत्या २८ फेब्रुवारीला बिहार अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ होणार आहे.