Monday, April 21, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखविराट वादळात पाकिस्तान उद्ध्वस्त

विराट वादळात पाकिस्तान उद्ध्वस्त

क्रिकेट हा भारतात धर्म मानला जातो आणि क्रिकेट खेळाडू ज्यात सचिन तेंडुलकर असतो त्यांना डेमी गॉड्स मानले जातात. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या भारत विरुद्ध पाक सामन्यात टीम इंडियाने यजमान पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि दणदणीत विजय संपादन केला. विराट कोहलीची शतकी दणदणीत खेळी आणि गोलंदाजांनी त्याला दिलेली तोलामोलाची साथ यांच्या जोरावर भारताने सामना जिंकला. पाकिस्तानने दिलेले २४२ धावांचे आव्हान भारताने सहज पार केले आणि या बहुप्रतीक्षित सामन्यात विजय प्राप्त केला. आधी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजीचे कंबंरडे मोडले आणि नंतर विराट कोहलीच्या शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आणि चॅम्पियन ट्रॉफी सामन्यात पाकिस्तावर विजय नोंदवला. या पराभवाबरोबरच पाकिस्तावर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामन्यांचा इतिहास अत्यंत कडवटपणाचा आणिबिघडलेल्या संबंधांचा आहे. फाळणीनंतर भारताला ज्या जखमा झाल्या त्यांची पार्श्वभूमी या क्रिकेटविषयक संबंधांना आहेच. पण क्रिकेट सामने भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रथम १९५२ मध्ये कसोटी आणि १९७९ मध्ये एकदिवसीय क्रिकेट सामने सुरू झाले.

पाकिस्तानने भारतीयांवर दहशतवादी हल्ले केले आणि त्यात कित्येक भारतीय लोक मारले गेले. त्यानंतर उभय देशांनी क्रिकेट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता तिसऱ्या देशाच्या भूमीवरच या दोन्ही देशात क्रिकेट खेळले जाते. हा इतिहास सर्वांना माहीत आहे. पण कालच्या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये असे दिसले की, टीव्ही फुटले नाहीत आणि मारामाऱ्या झाल्या नाहीत. दोन्ही देशांत क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय खेळ असला तरीही दोन्ही देशांनी क्रिकेट खेळणे बंद केले असल्याने त्यांच्यात संघर्ष उद्भवत नाही. पण आंतरराष्ट्रीय मैदानावर दोन देशांतील सामना असेल तेथे दोन्ही देशांचे नागरिक उपस्थित राहून आपापल्या संघांना बॅकअप करत असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने खेळले जात नसले तरीही त्यांच्यात यापूर्वी तीन युद्धे झाली आहेत. त्यात भारताचा विजय झाला आहे. त्या कडवटपणाचे प्रात्यक्षिक पाकिस्तानच्या कृत्यातून नेहमीच दिसते. या पार्श्वभूमीवर क्रिकेट सामना हा खेळ न पाहता त्याकडे युद्ध म्हणून पाहिले जाते आणि त्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला नमवले ही कोट्यवधी भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत समाधानाची बाब आहे. क्रिकेट हा खेळ भारतात अत्यंत चवीने पाहिला जातो आणि त्यावर चर्चा केली जाते. त्यात भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील सामना असला की, त्याला आगळीच धार येते. युद्धांच्या पार्श्वभूमीवर आणि पाकिस्तानच्या मांडीवर बसून दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या कृत्यांमुळे या दोन देशांतील सामन्यांना चांगलीच धार येते. तेच कालही घडले. या दोन देशांतील सामने नेहमीच अत्यंत हाय व्होल्टेज आणि रोमांचपूर्ण झाले आहेत. कालचा सामनाही त्यास अपवाद नव्हता.

भारताच्या दृष्टीने एक चांगली बाब घडली आणि ती म्हणजे विराट कोहली पुन्हा फॉर्मात परतला. विराट कोहली, रोहित शर्मा हे त्यांच्या कारकिर्दीच्या उतरत्या टप्प्यात आहेत. त्यातच विराटने आपला फॉर्म पुन्हा परतल्याची दिलेली ग्वाही दिलासा देणारी आहे. विराट कोहली बॅड पॅचमधून बाहेर आला आहे. ही भारतासाठी अत्यंत दिलासादायक बाब आहे. विराटच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आणि त्यात आहे १४००० धावा सर्वात वेगात पूर्ण करण्याच विक्रम आणि १५८ झेल. त्याची आकडेवारी ही त्याची महानता सिद्ध करते. त्याने हे रेकॉर्ड केले ते पाकिस्ताच्या संघाविरोधात ही अत्यंत चांगली बाब आहे. विराट कोहली त्याच्या बॅड पॅचमधून बाहेर आला आणि पाकिस्तानला चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर फेकण्याचा मार्ग मोकळा झाला. या बरोबरच विराटने ५१ वे एकदिवसीय शतकही झळकावले.

खरे तर हा सामना एकतर्फीच झाला असे म्हणावे लागेल. कारण या सामन्यात पाकिस्तानाने झुंज अशी ती दिलीच नाही. पाकिस्तानच्या खेळाच्या खाणाखुणाही दिसल्या नाहीत. विराटच्या शतकाच्या जोरावर आणि श्रेयस अय्यरच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने विजय मिळवला आणि भारताच्या गोलंदाजांनी उर्वरित काम पूर्ण केले. यावेळी ४७ कोटी प्रेक्षक सामन्याचा आनंद लुटण्यासाठी होते आणि त्यातील भारतीयच जास्त होते हे सांगायला नकोच.प्रत्येक क्षणाला वाढत असलेली भारतीयांची संख्या भारताच्या फलंदाजीपर्यंत ४७ कोटी झाली होती. यावरून या सामन्याच्या लोकप्रियतेचा अंदाज यावा. त्यातही पाकिस्तानसारखा आर्क रायव्हल असला, तर ती लोकप्रियता उच्च कोटीवर पोहोचते याचे प्रात्यक्षिक पुन्हा पाहायला मिळाले. भारत आणि पाक यांच्यातील सामन्याचे महत्त्व नेहमीच आगळे असते. पण यावेळी काल सर्वत्र या सामन्याची चर्चा जास्त सुरू होती. कारण इतका हाय व्होल्टेज सामना दोन्ही देशांतील प्रेक्षकांना फारच कमी वेळा पाहायला मिळतो. पाकिस्तान आता भारताच्या तुलनेत काहीच नाही. त्याची आर्थिक आणि लष्करी ताकद संपली आहे आणि पाकिस्तानची आर्थिक दशा तर अत्यंत दयनीय झाली आहे. तरीही केवळ भारताला टक्कर देऊ म्हणून भारतासमोर उभे राहाण्याचे धाडस हा चिमुकला देश करतो आहे. पण भारताने त्याला युद्धात आणि क्रिकेटच्या मैदानातही अनेक वेळा मात दिली आहे आणि नुकतेच त्याचे प्रत्यंतर आले. भारत-पाक यांच्यातील सामन्याची क्रेझ इतकी प्रचंड आहे की, सामन्याच्या आदल्या दिवशी लोक चौपट किंमत देऊन तिकिटे खरेदी करण्यास तयार होते. अर्थात त्यात यश आले नाही. पण भारत आणि पाक यांच्यात सामना कुठेही असो आणि तो जर क्रिकेटचा असेल, तर हमखास गल्ला भरतो अशी ख्याती पसरली आहे. त्याला अपवाद रविवारीही झाला नाही. क्रिकेट म्हणून या सामन्याला कितपत महत्त्व द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण भारतीय प्रेक्षकांना एक छान सामना पाहायला मिळाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -