भाविकांच्या दर्शनासाठी ४१ तास मंदिर राहणार खुलं
नाशिक : महाशिवरात्री अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यानिमित्त अनेक शिवभक्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भगवान शंकराच्या मंदिरात जातात. यातच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. दरवर्षी होणारी भाविकांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
GBS : वाढत्या जीबीएसच्या प्रभावाला रोखण्यासाठी पालिकेचा अॅक्शन मोड!
महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टने, त्र्यंबकेश्वर मंदिर २ दिवस चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी पहाटे ४ वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे. या काळात व्हीआयपी दर्शन आणि गर्भगृह दर्शन देखील बंद ठेवण्यात येणार आहे. तर २६ तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी देणगी दर्शन (पेड दर्शन) देखील बंद राहणार आहे.
महाशिवरात्रीनिमित्त ट्रस्टची जय्यत तयारी
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार इत्यादी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त ट्रस्टतर्फे त्तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवारी (२४ फेब्रुवारी) मेहंदी तसेच मंगळवारी (२५ फेब्रुवारी) हळदीचा समारंभ होणार आहे. सायंकाळी बासरी वादन कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघेल. पारंपरिक मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त येथे षोडशोपचार पुजा करुन संध्याकाळी पालखी पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानमध्ये येणार आहे. पालखी दरम्यान शिव तांडव ग्रुपतर्फे अघोर नृत्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सायंकाळी नटरंग अकॅडमी पुणे प्रस्तुत शिवार्पणमस्तू नृत्य कार्यक्रमाची प्रस्तुती अभिनेत्री प्राजक्ता माळी व सहकलाकार सादर करणार आहेत. ट्रस्टतर्फे बुधवारी (२६ फेब्रुवारी) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी करण्यात येणार आहे. विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री होणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टने दिली आहे.