मंडी : हिमाचल प्रदेशच्या मंडी येथे आज, रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३. ७ इतकी मोजण्यात आली. जमिनीच्या आत त्याची खोली ५ किलोमीटर होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार (एनसीएस) सकाळी ८ वाजून ४२ मिनीटांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र सुंदरनगर येथील किआर्गी होते.
तेलंगणा बोगदा दुर्घटना, अडकलेल्या आठ जणांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू
यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की भूकंपाचे केंद्र ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाजवळ एक तलाव आहे. या प्रदेशात दर २ ते ३ वर्षांनी एकदा लहान आणि कमी तीव्रतेचे भूकंप होतात. यापूर्वी २०१५ मध्ये येथे ३. ३ तीव्रतेचा भूकंप झाला होता. हिमाचल प्रदेशसोबतच दिल्ली-एनसीआर तसेच शेजारील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीत काही सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की इमारतींच्या आत तीव्र कंपने जाणवली. पहाटे ५ वाजून ३६ मिनीटांनी हा भूकंप जाणवला. दिल्लीच्या धौला कुआं येथील दुर्गाबाई देशमुख विशेष शिक्षण महाविद्यालयाजवळ भूकंपाचे केंद्र असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के बसल्यानंतर लोक घराबाहेर पडले. अनेक ठिकाणी भूकंपाच्या कमी तीव्रतेमुळे, बहुतेक लोकांना धक्के जाणवू शकले नाहीत. राज्यातील चंबा, शिमला, कुल्लू, लाहौल स्पीती, कांगडा, किन्नौर आणि मंडी येथील अनेक भाग भूकंपाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असलेल्या झोन-५ मध्ये येतात. म्हणूनच येथे वारंवार भूकंप होत राहतात.