Friday, March 28, 2025
Homeक्रीडापाकिस्तानची दाणादाण, भारतापुढे २४२ धावांचे आव्हान

पाकिस्तानची दाणादाण, भारतापुढे २४२ धावांचे आव्हान

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. पण त्यांना ५० षटके खेळणे जमले नाही. पाकिस्तानचा डाव ४९.४ षटकांत आटोपला. कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजाने अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा डाव २४१ धावांत आटोपला. आता भारतापुढे ५० षटकांत २४२ धावा करण्याचे आव्हान आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास साखळीतील सलग दोन सामने जिंकत भारत उपांत्य फेरीत प्रवेश करू शकले.

विराट कोहलीने केला सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम, हार्दिकने ओलांडला २०० बळींचा टप्पा

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचे सलामीचे दोन फलंदाज ५० धावा होण्याआधीच परतले. पाकिस्तानचा अर्धा संघ १६५ धावांवर बाद झाला होता. यानंतर भारतीय गोलंदाजांनी दबाव आणखी वाढवला आणि पाकिस्तान २५० धावांचा टप्पा गाठू शकणार नाही याची खबरदारी घेतली.

सलामीला आलेला बाबर आझम २३ धावा केल्यानंतर हार्दिक पांड्याच्या चेंडूवर यष्टीरक्षक केएल राहुलकडे झेल देऊन परतला. पाठोपाठ इमाम उल हक १० धावा करुन धावचीत झाला. अक्षर पटेलने त्याला धावचीत केले. कर्णधार असलेला मोहम्मद रिझवान ४६ धावा केल्यानंतर अक्षर पटेलच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. सौद शकील ६२ धावा करुन हार्दिक पांड्याच्या चेंडूवर अक्षर पटेलकडे झेल देऊन परतला. तय्यब ताहिर चार धावा करुन रविंद्र जडेजाच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. सलमान आघा १९ धावा करुन कुलदीप यादवच्या चेंडूवर रविंद्र जडेजाकडे झेल देऊन बाद झाला. शाहीन आफ्रिदी शून्य धावांवर कुलदीप यादवच्या चेंडूवर पायचीत झाला. नसीम शाह १४ धावा केल्यानंतर कुलदीप यादवच्या चेंडूवर विराट कोहलीकडे झेल देत तंबूत परतला. हारिस रौफ आठ धावा केल्यावर धावचीत झाला. त्याला अक्षर पटेलने यष्टीरक्षक केएल राहुलच्या मदतीने बाद केले. खुशदिल शाह ३८ धावा करुन हर्षित राणाच्या चेंडूवर विराट कोहलीकडे झेल देऊन बाद झाला. अबरार अहमद शून्य धावा करुन नाबाद राहिला.

भारताकडून कुलदीप यादवने तीन, हार्दिक पांड्याने दोन तर हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने बांगलादेश विरुद्धचा सामना सहा गडी राखून जिंकला आहे. तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पाकिस्तानने गमावला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा ६० धावांनी विजय झाला होता. यामुळे अ गटात न्यूझीलंड पहिल्या आणि भारत दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश तिसऱ्या आणि पाकिस्तान तळाच्या अर्थात चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास सलग दुसरा विजय मिळवत भारत थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. यामुळे भारत – पाकिस्तान सामन्यात काय होते याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -