साहित्यविश्वात अनेक साहित्यकृती निर्माण होतात आणि वाचकवर्ग त्यांचे उत्साहात स्वागत करतात. काही साहित्यकृती तर ‘माईलस्टोन’ ठरतात. अनेकदा अशा गाजलेल्या साहित्यकृतींचे माध्यमांतरही होताना दिसते. आतापर्यंत विविध कथा, कादंबऱ्या या रंगभूमीवर; तसेच छोट्या व मोठ्या पडद्यावर माध्यमांतर होऊन अवतरल्या आहेत. रसिकही त्यांच्या आवडीच्या अशा साहित्यकृतींच्या माध्यमांतराचे स्वागत करत आले असून, या कलाकृतींना रंगभूमीवर किंवा पडद्यावर अनुभवणे ही रसिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरलेली आहे. सध्या सर्वत्र एका मराठी साहित्यकृतीची मोठी चर्चा आहे आणि ती साहित्यकृती म्हणजे ज्येष्ठ साहित्यकार शिवाजी सावंत यांची ‘छावा’ ही कादंबरी…! सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या सगळ्याचा एक वेगळा परिणामही होताना दिसत आहे आणि तो म्हणजे ‘छावा’ या कादंबरीला आता वाचकांकडून खूप मागणी वाढली आहे.
अनेक पुस्तकांच्या दुकानांमध्ये ‘छावा’ ही कादंबरी विकत घेण्यासाठी वाचकवर्ग पायधूळ झाडताना आढळत आहे. काही ठिकाणी तर ही कादंबरी दुकानातून गायब झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी सद्यस्थितीत ही कादंबरी हमखास उपलब्ध होण्याचे ठिकाण म्हणजे विविध वाचनालये…! ‘छावा’ ही कादंबरी ऐंशीच्या दशकात जेव्हा प्रकाशित झाली, तेव्हापासूनच वाचकांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. कालांतराने या कादंबरीच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. ही कादंबरी ‘माईलस्टोन’ साहित्यकृती असल्याने बहुतेक सर्वच वाचनालयांत ती उपलब्ध आहे. सध्या ‘छावा’ या कादंबरीसाठी वाचकांकडून वाचनालयांकडे मोठी मागणी होताना दिसत आहे. अर्थातच, मागणी अधिक आणि पुरवठा कमी, या स्थितीमुळे वाचकांना ही कादंबरी आता हातात मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. एखाद्या साहित्यकृतीवर नव्याने निर्माण झालेल्या कलाकृतीमुळे, मूळ साहित्यकृतीवर कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो, याचे उदाहरण सध्या ‘छावा’ या चित्रपटाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे. या संदर्भात माहीम सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल संदीप पेडणेकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणतात, ‘आमच्या वाचनालयात शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीच्या प्रती अर्थातच आहेत आणि ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या कादंबरीला युवा पिढीकडून मागणी वाढली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाची व पराक्रमाची उजळणी पुन्हा एकदा युवा पिढी यानिमित्ताने करत आहे आणि हे आपल्या इतिहासाचे वैभव आहे. अशा चित्रपटामुळे वाचनाची ओढ वाढली, हे वाचनसंस्कृती जपणाऱ्या आमच्यासारख्या वाचनालयासाठी महत्त्वाचे आहे’.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…