अवघ्या एक रुपयांमध्ये महापालिकेच्या रुग्णांना मिळणार सोय
मुंबई : कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी येथील एसआरए इमारत क्रमांक १ मधील दवाखान्यासाठी आरक्षित असलेली जागा आता खासगी सहभाग तत्त्वावर खासगी संस्थेला हेमोडायलेसीस करता भाडेकरारावर देण्यात येणार आहे. दहा वर्षांकरता ही जागा हेमोडायलेसीसकरता दिली जाणार असून या ठिकाणी अवघ्या एक रुपयांमध्ये महापालिकेच्या रुग्णांना डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कांदिवली पश्चिम येथील लिंक रोडवर असलेल्या आर्चिड सबर्बिया समोरील एसआरए इमारत क्रमांक १ मध्ये दवाखान्यासाठीची सुमारे ३२५ चौरस मीटरची जागा आरक्षण समायोजनाअंतर्गत बांधून मिळाली आहे. ही जागा सार्वजनिक खासगी सहभाग प्रोत्साहन धोरणानुसार अर्थात पीपीपी अंतर्गत देण्यासाठी महापालिकेच्या वतीने संस्थांकडून अर्ज मागवले होते.
त्यात महापालिकेच्या वतीने मागवलेल्या या निविदेमध्ये रेनल प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून या संस्थेने प्रती डायलेसीस करता एक रुपयाकरता दर आकारण्याची संमती दर्शवली आहे. त्यानुसार या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या दवाखान्याच्या जागेवर एक रुपया दराने डायलेसीसची सुविधा देण्यासाठी हेमोडायलेसीस केंद्र सुरू ठेवण्याकरता प्रथम ५ वर्षांसाठी आणि त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी अशाप्रकारे एकूण दहा वर्षांकरता करार करण्यात येणार आहे. प्रती वर्षी एक रुपया प्रती चौरस मीटर एवढ्या दराने भाडेतत्वावर देण्यासाठी राज्य शासनाच्या मंजुरीसापेक्षा महापालिकेने ही मंजुरी दिली आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेनल प्रोजेक्ट ही संस्था या हेमोडायलेसीस केंद्रात रुग्णांना एक रुपयांमध्ये प्रती डायलेसीस एवढ्या दरात उपचार करेल. या केंद्रात उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैंकी कमीत कमी ४० टक्के रुग्ण हे महापालिकेने संदर्भित केलेले रुग्ण असतील आणि उर्वरीत ६० टक्के रुग्णांसाठी संस्था, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत तसेच राज्य, केंद्र तथा महापालिका यांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या योजनांचा लाभ घेवू शकेल. या संस्थेला मान्यता दिल्यापासून तीन महिन्यांमध्ये या हेमोडायलेसीस केंद्र सुरू करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच्या प्रत्येक आठवड्यासाठी या संस्थेला पाच हजार रुपये एवढा दंड असेल. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत हे केंद्र सुरू ठेवणे बंधनकारक राहणार आहे. ही संस्था हेमोडायलेसीस रुग्णांना महापालिकेच्या दरात उपचार देतील, त्यांना त्यापेक्षा जास्त दर आकारता येणार नाही.