विरार : सामान्य नागरिकांना ऑनलाइन सेवा पुरविण्यासोबतच मनपाचा कारभार सुलभ व पारदर्शक करण्यासाठी असलेल्या ‘ई गव्हर्नन्स’ या उपक्रमात राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने ९ वा क्रमांक पटकावला आहे. कोरोनानंतर सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये ऑनलाइन सेवा वितरणाचे महत्त्व वाढले आहे. शासनाने इ गव्हर्नन्स हा आधुनिक शासकीय चौकटीचा एक महत्त्वाचा घटक म्हणून ई गव्हर्नन्सचे कार्य सुरू केलेले आहे. राज्यातील महानगरपालिकांद्वारे वर्षभरात ‘ई गव्हर्नन्स’च्या माध्यमातून केल्या गेलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यात येते. यावर्षी सुद्धा पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच ‘पीआरओ’ या पुण्याच्या संस्थेने १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत २९ महानगरपालिकांचा ई-गव्हर्नन्स निर्देशांक तपासला.
Mumbai Crime : दादरच्या गेस्ट हाऊसमधून दोघांना अटक, १० कोटींचे अमली पदार्थ जप्त
यामध्ये पुणे महानगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावला असून कोल्हापूर द्वितीय, पिंपरी-चिंचवड या महापालिकेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. ई-गव्हर्नन्समधील सेवा, पारदर्शकता, वेबसाईट उपलब्धता, मोबाईल ॲप, सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या बाबींच्या केलेल्या मूल्यमापनात वसई-विरार शहर महानगरपालिकेने यावर्षी नववा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडिया या शीर्षकाखाली करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये राज्यातील १७ महानगरपालिकांनी चांगले काम केले असून यामध्ये वसई-विरार शहर महापालिकेचा सुद्धा समावेश आहे. वसई विरार महानगरपालिकेने वेबसाईट उपलब्धतेमध्ये १२ गुण मिळवले असून वेबसाईट सेवामध्ये १८ गुण, वेबसाईट पारदर्शकतेमध्ये २३ गुण, मोबाईल ॲपमध्ये १६ गुण तर सोशल मीडियामध्ये तीन पैकी तीन गुण मिळविले आहेत.