विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा महत्त्वाच्या ठरतात. आयुष्यामध्ये काय बनायचे याचा निर्णय बऱ्याच अंशी या दोन्ही निकालांवर विद्यार्थी व पालक घेत असतात. दहावी, बारावीच्या परीक्षा बोर्डाच्या असल्याने या परीक्षांसाठी सरकारकडून, शिक्षण बोर्डाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत असते. दरवर्षी दहावी, बारावीच्या परीक्षांचे पेपर फुटणे, कॉपीच्या घटनांमध्ये वाढ होणे अशा घटना वाढत असल्याने या परीक्षांबाबत जनसामान्यांमध्येदेखील उलटसुलट चर्चा होत असते. या घटनांची न्यायालयानेदेखील दखल घेऊन या परीक्षांच्या तयारीबाबत, आयोजनाबाबत, सुरक्षेबाबत ताशेरे ओढत राज्य सरकारांना, शिक्षण मंडळांवर ताशेरे ओढले होते. यावर्षी दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्या जाव्यात, यासाठी राज्य सरकारकडून तसेच शिक्षण मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तसेच कॉपीला खतपाणी घालणाऱ्या परीक्षा केंद्रावर कडक कारवाई करणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीरही करण्यात आले. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर नजर ठेवण्यासाठी शालेय आवारात, वर्गांच्या बाहेर ड्रोनने टेहाळणी करण्याचा प्रयोगही या वर्षीपासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. दहावीच्या सीबीएसई, आयसीएसईच्या परीक्षाही सुरू झालेल्या आहेत. शुक्रवारपासून महाराष्ट्र राज्य शालांत बोर्डाच्या परीक्षांनाही सुरुवात झाली.
बारावीच्या परीक्षेत अनेक ठिकाणी कॉपी करताना विद्यार्थी पकडले गेले. सीबीएसई, आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षेसाठी शाळेत प्रवेश करताना शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेकडून ज्या प्रकारे काटेकोरपणे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती, ते पाहिल्यावर दहावीच्या परीक्षेमध्ये कॉपी होणार नाही, कॉपीमुक्त अभियान यशस्वी होईल आणि परीक्षा पद्धतीला लागलेला कॉपीनामक कलंक कायमचाच संपुष्टात येईल, असा आशावादही समाजातील विविध घटकांकडून व्यक्त करण्यात येत होता; परंतु कॉपीमुक्त अभियान चांगले असले व त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारीदेखील जय्यत असली तरी पहिल्याच टप्प्यात शंभर टक्के यश मिळणे शक्यच नव्हते; परंतु कोठेतरी गंभीरपणे प्रयत्नांना सुरुवात होणे आवश्यक होते. महाराष्ट्र राज्याच्या सुरू झालेल्या शालान्त मंडळाच्या दहावीच्या पहिल्याच मराठीच्या पेपर कॉपीमुक्त अभियानाचे अक्षरश: धिंधवडे निघाले आहेत. मराठीच्या पहिलाच पेपरमध्ये कॉपी करण्याच्या घटना तर घडल्याच, पण काही ठिकाणी झेरॉक्स सेंटरवर अवघ्या काही रुपयांमध्ये मराठीच्या प्रश्नपत्रिका विकल्या गेल्याचा प्रकार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घडला आहे. जालन्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. जालन्यातल्या बदनापूरमध्ये दहावीची प्रश्नपत्रिका फुटली आहे. लोकांनी त्याची झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवली आहेत. बदनापूर येथील परीक्षेच्या ठिकाणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत मराठीचा पेपर फुटला. शहरातील झेरॉक्स सेंटरवर अवघ्या २० रुपयांत प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स मिळत होती. जालन्यामध्ये पेपर फुटल्यानंतर राज्य सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. बदनापूर बोर्डातून दहावाची प्रश्नपत्रिका बाहेर आलीच कशी? अशी चर्चा राज्यामध्ये सुरू झाली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये पार पडण्यासाठी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी परीक्षा केंद्रावरील बैठ्या पथकाने आवश्यक खबरदारी घ्यावी. ज्या परीक्षा केंद्रावर कॉपीचे प्रकार आढळून येतील तेथे कॉपी करणारा विद्यार्थी, त्याचे पालक, पर्यवेक्षक आणि केंद्र प्रमुख यांना जबाबदार धरण्यात येईल. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात कुणीही येणार नाही, परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स दुकाने परीक्षा कालावधीत सुरू राहणार नाहीत. याची काळजी परीक्षा केंद्रावर बंदोबस्तास असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घ्यावी, परीक्षा केंद्रावर कुणाचा हस्तक्षेप आढळल्यास त्वरित नियंत्रण कक्षास माहिती देण्याच्या सूचनाही तेथील कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. दहावी, बारावीच्या परीक्षेत आढळणाऱ्या सामूहिक कॉपी प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच गंभीर दखल घेतली आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहील, असे सांगतानाच ज्या केंद्रावर कॉपीचे प्रकार उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता रद्द करा. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपीसाठी मदत करतील त्यांना थेट बडतर्फ करा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या आधी दिले होते; परंतु पहिल्याच पेपरला अशी घटना घडल्याने कॉपीमुक्त अभियानाचे काय झाले? इतके दिवस केलेल्या तयारीवर अवघ्या काही मिनिटांतच पाणी कसे पडले? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती जनसामान्यांकडून समाजमाध्यमांवर करण्यात येत आहे. जालन्यात अन्य ठिकाणी परीक्षा केंद्रावर हुल्लडबाजीचा प्रकार कॉपी पुरवण्यासाठी करण्यात आल्याची घटनाही घडली आहे. जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी, परीक्षा केंद्राबाहेर तरुणांची हुल्लडबाजी व्हीडिओत कैद झाली आहे. परीक्षार्थींना बाहेरील गोंधळाचा परीक्षेदरम्यान त्रास सहन करावा लागला. मुळात वर्षभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉपीचा आधार का घ्यावा लागत आहे? हीच खरी शोकांतिका आहे. विद्यार्थ्यांनी कॉपी करणे हा पालकांनी तसेच शिक्षकांनी घडविलेल्या संस्काराचा अपमान आहे. कॉपीसाठी जीवघेणे नियोजन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येणार नाही. कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला असला तरी प्रशासनाने तयारीत सातत्य ठेवावे. यावर्षी आलेल्या मर्यादा, अपयश, त्रुटी यावर तोडगा काढून कदाचित पुढच्या वर्षी या अभियानाला नक्कीच शंभर टक्के यश मिळेल, असा आशावाद बाळगण्यास हरकत नाही.