तलासरी : पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून देशात लाखो गोरगरिबांना घरे देण्याचा कार्यक्रम सुरू असताना, केवळ काही अटींमुळे अनेक नागरिक या योजनेपासून वंचित राहात आहेत. तलासरी नगरपंचायत स्थापन झाल्यापासून पंतप्रधान आवास योजनेचा लाभ एकाही नागरिकाला मिळालेला नाही. त्यामुळं या योजनेच्या अटी आणि नियम शिथिल करावेत, अशी मागणी नगरसेवक आणि भाजपाचे शहराध्यक्ष सुरेंद्र निकुंभ यांनी पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली. निकुंभ यांनी यापूर्वी वारंवार याबाबत आवाज उठवला आहे.
शासनाशी पत्रव्यवहार देखील केला आहे. परंतु, अद्याप त्यांच्या पत्राची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तलासरी नगरपंचायतीमधील हद्दीत सर्व आदिवासी नागरिक राहतात. त्यांच्याकडे स्वतःच्या जमिनी नाहीत. ज्यांच्याकडं जमिनी आहेत, त्या वर्ग दोनच्या असल्यानं तेथेही निवासस्थान मिळत नाही. त्यामुळं या योजनेच्या अटी शिथिल करून, वर्ग दोन जमिनी असतील किंवा कच्चं घर असूनही घरपट्टी असेल तर अशा लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यातील अटी शिथिल करण्याची मागणी निकुंभ यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.