Thursday, March 27, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेKasara Local : बाळाच्या शांत झोपेसाठी कसारा लोकलमध्ये झोळी

Kasara Local : बाळाच्या शांत झोपेसाठी कसारा लोकलमध्ये झोळी

कल्याण  : उन्हाचा चटका सकाळपासून वाढू लागला आहे. दुपारच्या वेळेत या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असते. अशातच दुपारच्या वेळेत कसारा लोकलमधून प्रवास करत असलेले आईच्या कडेवरील एक बाळ उन्हाची तलखी, गरम हवा यामुळे अस्वस्थ होऊन रडत होते. बाळाला हरतऱ्हेने शांत करण्याचा आई-वडिलांचा प्रयत्न सुरू होता. अखेर पालकांनी एक नामी शक्कल लढवली. लोकलमध्ये पिशव्या ठेवण्याच मंच आणि हात दांड्याला जवळील चादरीची झोळी करून त्यात बाळाला झोपविले. त्यानंतर अस्वस्थ झालेले बाळ काही क्षणात शांत होऊन गुडूप झोपी गेले. कसारा लोकलमध्ये हा प्रकार घडला.

रडून रडून हैराण झालेले बाळ हलत्या डुलत्या लोकलमधील झोळीत टाकताच शांत झालेले पाहून उपस्थित महिला, पुरुष प्रवासीही आश्चर्य व्यक्त करू लागले. अलीकडील नवीन लोकलमध्ये मोठ्या खिडक्या, दरवाजातून सतत लोकल डब्यात हवा खेळती राहील अशी व्यवस्था आहे. दुपारच्या वेळेत लोकलमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांना बाहेरील उन्हाच्या झळा, गरम वाफांचा चटका लोकलमधील पंखे सुरू असुनही बसतो. लोकलमधील पंखे सुरू असले तरी बाहेरील गरम झळांमुळे पंख्यांच्या माध्यमातून गरम हवा मिळते. त्यामुळे प्रवासी हैराण होतात.

Kalyan News : ‘६५ इमारतींमधील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही’ – डॉ. श्रीकांत शिंदे

दुपारी एक दाम्पत्य कसारा लोकलमधून आपल्या लहानग्या बाळाला घेऊन प्रवास करत होते. फलाटावर असेपर्यंत बाळ शांत होते; परंतु एकदा लोकलमध्ये चढल्यानंतर लोकलमध्ये बाहेरील उन्हाचा झळा सुरू झाल्या. तसे बाळ अस्वस्थ झाले. इतर महिला, प्रवाशांनी खाणाखुणा करून बाळ शांत होईल यासाठी प्रयत्न केले. पण बाळाचा रडण्याचा आवाज चढला होता. बाळ काही करून शांत होत नव्हते.

उन्हाच्या तलखीमुळे बाळ रडत असल्याचे समजल्यावर पालकांनी लोकलमध्येच बाळाला झोपण्यासाठी झोळी तयार केली. नेहमीच घरी झोळीत झोपायची सवय असलेले बाळ झोळीत टाकताच, काही वेळाने शांत होऊन गाढ झोपी गेले. लोकल धावत होती, त्याप्रमाणे झोळीही गती घेत हलत डुलत होती. लोकलमधील ही झोळी प्रवाशांच्या चर्चेचा विषय झाली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -