डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आसनगाव ते वाशिद रेल्वे स्थानकादरम्यान एका विद्यार्थिनीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थिनी डोंबिवलीतील एका शाळेत दहाव्या इयत्तेत शिकत होती. शालांत परीक्षेच्या आधी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एकीकडे विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे तिच्या माता-पित्याने आकांत केला आहे. तर दुसरीकडे या विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही मुलगी पश्चिम डोंबिवलीच्या भोपर परिसरात राहत असल्याची माहिती तपासादरम्यान उघडकीस आली आहे.
महाकुंभाहून परतताना कारचा अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
लोकलमधून पडून या मुलीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेची कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा जगताप असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. १६ वर्षीय आकांक्षा डोंबिवलीतल्या एका शाळेत दहावी इयत्तेत शिकत होती. २१ फेब्रुवारी रोजी तिचा पहिला पेपर होता. दहावीची परीक्षा सुरू होण्याआधीच तिचा मृतदेह पोलिसांना आसनगाव-वाशिंद या स्थानकांच्या दरम्यान रेल्वेच्या रूळाशेजारी आढळला.