पाटणा : प्रयागराजमध्ये महाकुंभात स्नान करुन घरी परतत असताना आरा-मोहनिया राष्ट्रीय महामार्गावर आज २१ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला.यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.जगदीशपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरा-मोहनिया राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींमध्ये पाटणा येथे राहणाऱ्या संजय कुमार, करुणा देवी, लाल बाबू सिंह, जूही राणी, आशा किरण, प्रियम कुमारी यांचा समावेश आहे.हे कुटुंब पाटणा येथे त्यांच्या घरी प्रयागराजहून जात होते. तेव्हा पाटण्यापासून ४० किमी आधी आरा-मोहनिया राष्ट्रीय महामार्गावर एका पेट्रोल पंपाजवळ कारचा अपघात झाला.
ही कार रस्त्याच्या शेजारी असलेल्या ट्रकला जाऊन आदळली. अपघात इतका भयंकर होता की, अवघ्या पाच मिनिटांमध्ये कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर जमलेल्या लोकांनी पोलिसांना संपर्क केला. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी बचावकार्य सुरु केले. पण त्याआधीच कारमधल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता.ड्रायव्हरला डुलकी आल्याने अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.