नवी दिल्ली : मराठी भाषेचा प्रसार केवळ लिखाणातूनच नव्हे, तर बोलीतूनही झाला आहे. भाषा ही संस्कृतीचे बलस्थान असते आणि ती समाजाला जोडणारी असावी, तोडणारी नव्हे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.
डॉ. भवाळकर म्हणाल्या, “एका स्त्रीने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणे हे महत्त्वाचे नाही, तर गुणवत्ता हा मुख्य मुद्दा आहे. संतांनी मराठी भाषा टिकवली आणि ती जिवंत ठेवली. भाषा फक्त ग्रंथांमध्ये साठवून ठेवल्यास तिचा उपयोग नाही, ती बोलली गेली पाहिजे. महाराष्ट्राला पांडुरंगाचे स्मरण करून देणारी हीच मराठी भाषा आहे, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना गावोगावी मावळे मिळाले.”
दिल्लीतील ९८वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
त्या पुढे म्हणाल्या, “विठ्ठल-रखुमाई हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, आमच्या उदार संस्कृतीचे प्रतीक आहेत. ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी’ असे सांगणारे संत सावता माळी आणि ‘माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंक’ असे सांगणारे संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेला जीवंत ठेवले.”