Tuesday, March 18, 2025
Homeदेशदिल्लीतील ९८वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

दिल्लीतील ९८वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तब्बल ७१ वर्षांनंतर राष्ट्रीय राजधानीत मराठी साहित्य संमेलन भरवले जात असून, तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ लोकसाहित्य संशोधक डॉ. तारा भवाळकर यांनी भूषवले आहे.

उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, तसेच साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे उपस्थित होत्या. कार्यक्रमात काश्मिरी तरुणी शमीमा अख्तर हिने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत गात रसिकांना मंत्रमुग्ध केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

२३ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात साहित्यिक चर्चा, पुस्तक प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि संवादात्मक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. भाषा जतन, अनुवाद आणि साहित्याच्या डिजिटलायझेशनवर विशेष चर्चासत्रे होणार आहेत. यावर्षीचे प्रमुख आकर्षण म्हणजे पुण्याहून दिल्लीपर्यंतचा साहित्यिक रेल्वे प्रवास, ज्यामध्ये १२०० साहित्यप्रेमी सहभागी झाले आहेत.

संमेलनात २६०० हून अधिक कविता सादरीकरणे, ५० पुस्तकांचे प्रकाशन आणि १०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल्स असतील. देशभरातील प्रतिष्ठित साहित्यिक, कवी आणि अभ्यासक या साहित्य मेळाव्यात सहभागी झाले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे मराठीशी आला संबंध – पंतप्रधान

मराठीतून विचार केल्यावर ज्ञानेश्वरांच्या “माझा मराठी चा बोल कौतुके। परि अमृताते हि पैजा जिंके” या ओवींचे अलबत स्मरण होते. परंतु, माझा मराठी भाषेशी पहिला संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे आल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

दिल्लीच्या विज्ञान भवनात ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी मोदी म्हणाले की, मराठी माणसांनी रोवलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बिजाचा आता वटवृक्ष झालाय. शताब्दी वर्षात गेलेल्या संघाने माझ्यासारख्या अनेकांना देशासाठी जगायला शिकवले. संघामुळेच माझा मराठी भाषेशी संबंध आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यावेळी मराठी सारस्वतांना नमन करताना मोदी म्हणाले की, मराठी साहित्यात देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे. ज्ञानबा तुकारामांच्या मराठीला राजधानी अतिशय मनापासून अभिवादन करतो. पवारांमुळे या कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली. आजतर जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही साहित्य संमेलनाचा दिवसही अतिशय चांगला निवडल्याचे मोदींनी आपल्या भाषणात नमूद केले.

मराठी भाषेमध्ये जशी शूरता आहे तशी विरताही आहे, संवेदनाही आहे आणि सहवेदनाही आहे म्हणूनच भक्ति शक्ती युक्ती हे मराठी सामर्थ्य आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. जगभरात १२ कोटी मराठी भाषिक लोक आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी काही दशके मराठी लोक प्रयत्न करत होते. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला आहे. ते काम पूर्ण करण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. असेही मोदी यांनी स्पष्ट केले. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही तर ते संस्कृतीचे संवाहक असते. भाषा समाजात निर्माण होते पण समाज घडवण्याचेही महत्वाचे काम भाषेच्या माध्यमातूनच होत असते. आपल्या मराठीने देशभरातील अनेक लोकांना अभिव्यक्त होण्याची संधी देऊन संस्कृती समृद्ध केली आहे.

सर्मर्थ रामदास यांच्या ओळी ‘मराठा तेतुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा आहे तितके जतन करवे पुढे आणि मिळवावे राज्य जतन करावे’ याचा संदर्भ घेत त्यांनी सांगितले की मराठीत शुरताही आहे विरताही आहे, सौदर्यही आहे संवेदनाही आहे, समानताही आहे समरसताही आहे, आध्यात्माचे स्वर आहेत तर आधुनिकतेची लहरही आहे, मराठीत भक्ती आहे शक्तीही आहे आणि युक्तीही आहे. जेव्हा भारताला आध्यात्माची गरज होती तेंव्हा महाराष्ट्रातील संतांनी प्राचिन काळातील ॠषींच्या ज्ञानाला मराठी भाषेत आणले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत बहिणाबाई, गोरा कुंभार, तुकडोजी महाराज यासह असंख्य संतांनी संत परंपरेच्या माध्यमातून देशाला दिशा देण्याचे काम केल्याचे मोदी यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -