दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री म्हणून भाजपाच्या रेखा गुप्ता यांनी गुरुवारी शपथ घेतली. तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपाचे सरकार स्थापन झाले. भाजपाच्या सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखालील सरकार काँग्रेसने हटवले व शीला दीक्षित पंधरा वर्षे मुख्यमंत्री राहिल्या. नंतर काँग्रेसचे सरकार ‘आप’ने हटवले व अरविंद केजरीवाल व शेवटचे काही महिने आतिशी मुख्यमंत्री राहिल्या. यावर्षी ८ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला व भाजपाला निर्विवाद बहुमत प्राप्त झाले. दोन तृतियांशपेक्षा जास्त जागा भाजपाने जिंकल्या. मोदींची लोकप्रियता, करिष्मा सर्वश्रेष्ठ असल्याचे निकालाने सिद्ध केले. मोदींच्या जादूने कमाल केली आणि केंद्रात हटट्रीक संपादन करणाऱ्या भाजपाने दिल्लीतही कमळ फुलवले. देशभरात २१ राज्यांत आता भाजपा सत्तेवर आहे, हा सुद्धा मोठा विक्रम आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापन व्हायला बारा दिवस लागले. दिल्लीची सत्ता भाजपाला मिळाली पण दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याची संपूर्ण देशाला उत्सुकता होती. दिल्लीच्या निवडणुकीत भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. त्यामुळे केजरीवाल यांच्यानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री कोण यावर अनेक तर्क-वितर्क प्रकट झाले. पण भाजपा श्रेष्ठींनी रेखा गुप्ता यांची या पदासाठी निवड करून आश्चर्याचा धक्का दिलाच पण पक्ष संघटना व कार्यकर्त्यांना यांना आपण महत्त्व देतो हे पंतप्रधान नरेद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व देशाला दाखवून दिले. रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत. सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी यांच्यानंतर हा मान त्यांना मिळाला आहे. सुषमा स्वराज व आतिशी यांना मुख्यंमत्रीपदावर राहण्याची संधी अल्पकाळ मिळाली होती. तर शीला दीक्षित या सलग तीन टर्म मुख्यमंत्री होत्या. रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करताना पक्ष श्रेष्ठींनी निवडून आलेल्या दिग्गजांची नावे बाजूला ठेवली हेही लक्षात घेण्यासारखे आहे. रेखा गुप्ता या संघ परिवाराच्या संस्कारातूनच पुढे आल्या. विद्यार्थी असताना त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे झोकून काम करीत असायच्या. त्यांना कोणतीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. राजकीय घराणेशाहीचा आरोप त्यांच्यावर चुकूनही कोणाला करता येणार नाही. सार्वजनिक जीवनात काम करणारी मध्यमवर्गीय गृहिणी म्हणजे रेखा गुप्ता हीच त्यांची दिल्लीतील प्रतिमा आहे. वाजपेयी-अडवाणींच्या काळापासून त्या पक्ष संघटनेत सक्रिय आहेत. त्यांचा राजकीय प्रवास म्हणजे पक्ष निष्ठा, इमानदारी व कार्यक्षमता सिद्ध करणारा आहे.
शालिमार बाग मतदारसंघातून प्रथमच आमदार झालेल्या ५० वर्षीय रेखा गुप्ता यांचे सर्वसामान्य जनतेतूनही उत्स्फूर्त स्वागत झालेले बघायला मिळाले. विधानसभा निवडणूक काळात मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून ओळखला जाणारा शीशमहाल खूप गाजला होता. शीशमहालच्या नूतनीकरणावर आप सरकारने ४५ कोटी खर्च केल्याचा आरोप भाजपाने केला होता. शीशमहाल हे भ्रष्टाचाराचे प्रतीक बनले होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रेखा गुप्ता यांनी आपण वादग्रस्त शीशमहालमध्ये राहायला जाणार नाही असे जाहीर करून टाकले व त्याचे दिल्लीकरांनी कौतुकही केले. त्या म्हणाल्या-माझ्यावर पंतप्रधान मोदी व पक्षाच्या हायकमांडने जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी कधीच विचार केला नव्हता की मी दिल्लीची मुख्यमंत्री होईन, पण मी त्या काचेच्या महालात राहायला जाणार नाही. रेखा गुप्ता या उच्चशिक्षित असून पेशाने वकील आहेत. एनडीएच्या त्या एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. त्यांनी कॉलेज जीवनात दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाचे सचिव म्हणून काम केले. भाजपा युवा मोर्चा दिल्लीच्या त्या सचिव होत्या, पीतमपुरा व शालिमार बाग प्रभागातून त्या तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या, दिल्ली प्रदेश महिला मोर्चाच्या त्या सरचिटणीस होत्या, भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य होत्या. संघटनेचा त्यांना मोठा अनुभव आहे, त्याच कामाची पावती म्हणून श्रेष्ठींनी त्यांच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्याची जबाबदारी सोपवली. शालिमार बाग मतदारसंघातून यंदा त्यांनी आप व काँग्रेस अशा दोन्ही उमेदवारांचा पराभव करून २९,५९५ मतांनी विजय मिळवला ही सुद्धा त्यांची जमेची बाजू आहे. शीला दीक्षित किंवा अरविंद केजरीवाल हे दोन्ही मुख्यमंत्री नवी दिल्ली मतदारसंघाने दिले होते. रेखा गुप्ता मात्र शालिमार बागमधून निवडून आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपाचे प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघात दणदणीत पराभव केला. प्रवेश यांचे वडील साहबसिंह वर्मा हे दिल्लीचे भाजपाचे मुख्यमंत्री होते. प्रवेश यांनी केजरीवाल यांचा पराभव केल्याने त्यांना मीडियाने जायंट किलर अशी मोठी प्रसिद्धी दिली. तेच मुख्यमंत्री होतील असे अंदाजही व्यक्त झाले. खरं तर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पक्षाचे सहा दिग्गज नेते होते. पण मोदी-शहांनी रेखा गुप्ता या प्रसिद्धीपासून दूर असलेल्या महिला कार्यकर्तीची निवड केली व भाजपा महिला सक्षमीकरणाला कसे प्राधान्य देते हा त्यातून संदेश दिला. दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर झालेल्या शानदार शपथविधी सोहळ्यास स्वत: पंतप्रधान नरेद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच देशातील भाजपाचे मुख्यमंत्री आणि एनडीएचे उपमुख्यमंत्री आवर्जून हजर होते. भाजपाचे सरकार दिल्लीत स्थापन झाले तरी आम्ही एनडीएला बरोबर घेऊन कारभार चालवत आहोत, असा विश्वास भाजपाने सर्व मित्रपक्षांना दिला आहे. दिल्लीकर जनतेने भाजपाला प्रचंड बहुमत देऊन दिल्लीची सत्ता दिली आहे म्हणूनच दिल्लीकरांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत.