मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन असणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. गर्दीमुळे अनेक प्रवाशांना धक्काबुक्कीचा त्रास सहन करावा लागतो. मात्र आज मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना हा धक्का जीवावर बेतला आहे.
कल्याण डोंबिवलीदरम्यान धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणहून दादरला जाणाऱ्या लोकलमध्ये एका १९ वर्षीय तरुणाने धक्का लागल्यामुळे तीन प्रवाशांवर चाकूहल्ला केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही वेळातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. परंतु या घटनेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.