पुणे : महाराष्ट्रात सध्या गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) ने धुमाकूळ घातला असून त्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुणे, मुंबई, नाशिक पाठोपाठ राज्यातील अनेक शहरांमध्ये या आजाराचे थैमान सुरू असून अनेक रुग्ण आढळले आहेत. अशातच आता पुणे शहरात आणखी दोन रुग्णांचा गुलियन बॅरे सिन्ड्रोम या आजारानं मृत्यू झाला आहे. यामुळं या आजारानं मृत्यू झालेल्यांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. ससून सर्वोपचार रुग्णालयात ३७ वर्षांच्या पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. हा दौंड येथील रहिवासी होता.
हातात अशक्तपणा, अचानक जुलाब, जीबीएसमुळे रुग्ण त्रस्त
पुण्यातील खासगी रुग्णालयात २५ वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. ती नांदेड सिटीमधील रहिवासी होती. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. तिला १५ जानेवारीला जुलाबाचा त्रास झाला. त्यानंतर गिळण्यास त्रास सुरू होऊन तिला बराच अशक्तपणा जाणवू लागला. त्या तरूणीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती बिघडल्याने तिलाही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर १८ फेब्रुवारी रोजी तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर राज्यातील जीबीएसच्या रुग्णांचा एकूण आकडा हा २११ वर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र भीतीच्या सावटाखली जगत आहेत.जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात ९ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
जीबीएसची स्थिती
एकूण रुग्णसंख्या – २११
रुग्णालयात दाखल – ५६
अतिदक्षता विभागात – ३६
व्हेंटिलेटरवर – १६
बरे झालेले रुग्ण – १४४
मृत्यू – ११