मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना ईमेल द्वारे पाठवण्यात आली आहे. या मेलमध्ये त्यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याबद्दल म्हटले आहे. हे धमकीचे ई मेल गोरेगाव आणि जेजे मार्ग पोलीस स्टेशन तसेच मंत्रालयात पाठवण्यात आले आहेत.
यानंतर मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.धमकी पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ई मेल आयडीचा आयपी ॲड्रेस अधिकारी शोधत आहेत. दरम्यान शिंदे यांच्याभोवतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून शोध सुरु आहे. याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती.
एकनाथ शिंदे आज दिल्लीत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील दिल्लीत आहेत. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी हे नेते दिल्ली दौऱ्यावरती आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला व्यासपीठावर आले. तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ थांबून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत संवाद साधला. त्यावेळी तिघांमध्येही हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.