मेट्रोच्या दोन विस्तारीत मार्गांना पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता
पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दोन विस्तारित मार्गांना महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिली. हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन या दोन विस्तारित मार्गांचा यामध्ये समावेश असून, यासाठी महापालिकेवर खर्चाचा कोणताही भार येणार नाही, या अटीवर हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. या दोन्ही मेट्रो मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार असून, पुढील काही महिन्यांमध्ये याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महामेट्रोच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ तयार करण्यात आला. यामध्ये शहरातील विविध भाग एकमेकांना मेट्रोच्या माध्यमातून जोडण्यासाठी नियोजन केले जात आहे. यासाठी मेट्रोचे जाळे तयार केले जाणार आहे. पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुमटा) बैठकीत मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार महामेट्रोने हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन असे मेट्रोचे दोन विस्तारित मार्ग तयार करण्यात आले.
Rekha Gupta : रेखा गुप्ता उद्या घेणार दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
हे दोन्ही प्रकल्प महापालिकेच्या हद्दीत केले जाणार असल्याने प्रकल्पांचा डीपीआर स्थायी समितीमार्फत महापालिकेच्या मुख्य सभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्याला मुख्य सभेने मान्यता दिली, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. या दोन्ही मार्गांवरील मेट्रो प्रकल्पामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार असून, याचा फायदा प्रवाशांना होणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी महापालिकेवर कोणताही आर्थिक भार येणार नाही. या दोन्ही विस्तारित मेट्रो मार्गांच्या प्रकल्पांसाठी पुणे महापालिकेला जमिनीसाठीचे योगदान म्हणून ३ कोटी ६० लाख रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. केंद्र सरकारची यासाठी मान्यता मिळाल्यानंतर हा निधी दिला जाणार आहे.
प्रस्तावित मेट्रो मार्ग: हडपसर ते लोणी काळभोर मार्ग–११.३५ किलोमीटर, तर हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन–५.५७ किमी आहे. एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी मेट्रोची मोठी भूमिका आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट, वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर सध्या मेट्रो सुरू आहे. याचा फायदा नागरिक घेत असून त्याला चांगला प्रतिसाद आहे. या पार्श्वभुमीवर शहरात मेट्रोचे जाळे निर्माण करणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.