Sunday, October 26, 2025
Happy Diwali

संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

मुंबई (प्रतिनिधी): अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा छावा चित्रपट सध्या बॉलिवूड विश्वात धुमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि बलिदानाची कथा या सिनेमाच्या माध्यमातून ७० मिमी पडद्यावर साकारण्यात आली असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या सिनेमाला मिळत आहे.

सिनेमातील अनेक सीन अंगावर शहारे आणणारे आहेत, तर काही सीन्स पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचेही दिसून येते. त्यातच, बुधवारी, १९ फेब्रुवारी रोजी छपत्रती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असून ‘छावा’ चित्रपटामुळे संभाजी महाराजांच्या बलिदानाची कथा अभिमानाने आणि तितक्याच संवेदनेने समोर येत आहे. मात्र, इंटरनेट विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे. इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींकडून हा मजकूर हटविण्याची मागणी केली जात आहे. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर इंग्रजीत आक्षेपार्ह लिखाण केलेले आहे. यासंदर्भात, आपण सायबरच्या आयजींना सांगितले आहे. तसेच, विकिपीडियावर संपर्क करत याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, त्यांच्यासंदर्भात असले लेखन खपवून घेणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आपल्याला कल्पना आहे की विकिपीडीया हे भारतातून संचालित होत नाही, त्यांचे नियम आहेत. यासंदर्भातील एडिटोरीयल राईट्स कोणाकडे असतात, हे पाहिले जाईल. ऐतिहासिक गोष्टी तोडून मोडून करण्यापेक्षा नियमावली तयार करा, अशा सूचना आपण देऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

माध्यमांची भौगोलिक रचना होती, मात्र आता समाज माध्यमामुळे ती नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असीमित नाही, दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर कोणीही घाला घालू शकत नाही. यासंदर्भात नियमावली तयार करता येईल का? याचा विचार सुरू आहे. दरम्यान, विकिपीडियातील मजकूरसंदर्भात कारवाई केली जाईल, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment