Thursday, March 27, 2025
Homeमहामुंबईनवी मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा वेतन प्रश्न लवकर मार्गी लागणार

नवी मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा वेतन प्रश्न लवकर मार्गी लागणार

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे आश्वासन

मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल. यासंदर्भात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना मार्गदर्शन करून उचित मार्ग काढून कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे सांगण्यात आले असल्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेमध्ये सुमारे ८००० साफसफाई कर्मचारी ठेकेदारांमार्फत कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. तर नवी मुंबई परिवहन मध्ये १४०० आणि महापालिकेमध्ये १००० असे कर्मचारी हे ठोक मानधन, रोजंदारी आणि सहा महिने नियुक्ती तत्त्वावर कार्यरत आहेत. परंतु २०१० पासून या कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन तुटपुंजे सआहे.आणि म्हणूनच नवी मुंबई महापालिकेमधील कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीच्या प्रश्नावर श्रमिक सेनेने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे विनंती केली होती.त्यानुसार मंत्री गणेश नाईक यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या समवेत श्रमिक सेना शिष्टमंडळाची बैठक घडवून आणली.

Mumbai Goa highway : मुंबई गोवा महामार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होणार; नितीन गडकरी यांचे आश्वासन

या बैठकीमध्ये शिष्टमंडळाने मुद्देसूदपणे कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीचा आणि अन्य सुविधांचा विषय उपस्थित केला. कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलता याव्यात यासाठी न्यायपूर्ण वेतन वाढीची आग्रही मागणी कामगार मंत्र्यांकडे केली. ही वेतन वाढ नियमाप्रमाणे नियमित झाली पाहिजे, अशी मागणी देखील केली. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीसाठी नियुक्त केलेल्या श्रीवास्तव समितीचा अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश दिले.

महापालिका ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांनी हा अहवाल प्राप्त होताच पुढच्या एका आठवड्यात वेतन वाढीचा निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, असे महापालिका प्रशासनाला आदेशित केले. नवी मुंबई महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने हा निर्णय फक्त नवी मुंबई महापालिकेला लागू होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस माजी खासदार तथा श्रमिक संघटनेचे अध्यक्ष संजीव नाईक, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन,नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, कामगार आयुक्त एच पी तुमोड, कामगार उपायुक्त प्रदीप पवार, कामगार उपायुक्तवाघ, सहाय्यक कामगार आयुक्त राऊत यांच्यासह कामगार विभागाचे उच्च अधिकारी उपस्थित होते. श्रमिक सेनेच्या वतीने सरचिटणीस चरण जाधव,सुरज पाटील,विजय साळे हे पदाधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत महापालिका आयुक्तांच्या स्तरावर एका समितीचे गठण करण्यात आले असून या समितीचा अहवाल लवकर महानगरपालिकेकडे सादर केला जाणार आहे. या समितीच्या अहवालानंतर कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल, असेही मंत्री फुंडकर यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा विषय हा त्या त्या महानगर, नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित असल्याने आयुक्तांनी कामगारांच्या वेतन प्रश्नांवर सहानुभूतीने विचार करावा, असेही सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -