कणकवली : आपण हवाई मार्गे मुंबई-गोवा महामार्गाची (Mumbai Goa highway) पाहणी केली असून, हा महामार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दिले.
देवगडचे लोकप्रिय माजी आमदार स्व. जनार्दन मोरेश्वर उर्फ आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप समारंभाला ना. गडकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा उल्लेख केला आणि हा मार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले.
तसेच, जलवाहतूक तोट्याची ठरत असल्याने सी-प्लेन हा उत्तम उपाय आहे. ही वाहतूक कोकण किनारपट्टीवर कोणताही निधी खर्च न करता सुरू करता येईल. यासाठी आपण पुढाकार घ्यावा, मी तुम्हाला योग्य ती मदत करेन असे आश्वासन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना दिले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले चिपी विमानतळावर स्वागत!
त्याचप्रमाणे, वॉटर कार हा प्रकल्पही अंतिम टप्प्यात आहे. रस्त्यावरून पाण्यात आणि पाण्यातून पुन्हा रस्त्यावर फिरणारी बस लवकरच कोकण किनारपट्टीवर सुरू करू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.
आप्पासाहेब गोगटे यांचे स्वप्न असलेला इळये-वरंडवाडी पूल केंद्रीय मार्ग निधीतून उभारण्यासाठी आवश्यक निधी देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.