Thursday, March 27, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखरस्ते खड्डेमुक्तीचा संकल्प, वगैरे… वगैरे

रस्ते खड्डेमुक्तीचा संकल्प, वगैरे… वगैरे

मुंबई महानगर पालिकेने खड्डेमुक्तीचा ध्यास घेत शहर आणि उपनगरांमधील सर्वच रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व रस्त्यांची सर्व कामे एकाच वेळी मंजूर केल्याने विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होत आहे. मुळात जिथे वर्षाला महापालिका प्रशासन ३०० ते ४०० कोटी रुपयांची सिमेंट काँक्रिटची कामे हाती घ्यायची, तिथे दोन टप्प्यांत तब्बल ८०० किलोमीटरहून अधिक लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेतात. ती सुद्धा तब्बल १२ ते १३ हजार कोटी रुपयांची. एवढी तर कामे सत्ताधाऱ्यांनी आपल्या २५ वर्षांच्या काळात केली नव्हती. त्यामुळे एकाच वेळी सिमेंट काँक्रिटची कामे घेण्यात आल्याने या कामांना गती मिळत असून एरव्ही डांबरीकरणाची रस्त्यांचा विकास अधिक आणि सिमेंट काँक्रिटचा कमी टक्केवारीतच सांगायचे झाल्यास सिमेंट काँक्रिटच्या रस्ते कामांची टक्केवारी २०, तर डांबरीकरणाची ८० टक्के असायची. परिणामी डांबरीकरणाच्या रस्त्यांवरच पावसाळ्यात खड्डेच पडत आहेत.

सचिन धानजी

अर्थसंकल्प मांडल्यानंतर मागील आठवड्यात महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी रस्ते कामांचा आढावा घेताना, काँक्रिटीकरण कामांचा दर्जा, गुणवत्ता यांच्याशी कदापि तडजोड खपवून घेतली जाणार नाही, याची दक्षता बाळगा, असाही गर्भित इशारा दिला. पण या इशाऱ्यानंतर प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी होणारी चालूगिरी थांबणार आहे का? आयुक्त, तसेच अतिरिक्त प्रत्येक कामांची पाहणी प्रत्यक्ष जावून करणार आहेत का? याच रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत उपनगराचे पालकमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी आपल्याच मतदार संघातील रस्ते कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मतदार संघातील नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याच्या पृष्ठभागावरच तडे पडलेले पहायला मिळाले. अभियांत्रिकी भाषेत हे तडे तथा चिरा वरच्या भागांत असतील. पण त्या खालील बाजुस नसल्याने त्याला धोका नाही; परंतु याच चिरा भविष्यात अतिउष्ण तापमानाने अधिक वाढवून त्या तळापर्यंत पोहोचणार नाहीत याची हमी कोण देणार? अशाप्रकारची सर्टीफिकेट देऊन अभियंते हे कंत्राटदारांचा हमी कालावधी पूर्ण होण्याची वाट पाहतात आणि तोपर्यंतचे त्यांचे पैसे देऊन ते मोकळे होतात. पण जर अशाप्रकारे नवीन बनवलेल्या रस्त्याला तडे गेलेले असतील तर पुन्हा तोडायला लावून नवीन बनवण्यास भाग पाडण्याचे प्रमाण फारच कमी आहे. दादरमधील समर्थ व्यायाम मंदिर रोड, पाटील रोड तसेच माहिम येथील छोटानी मार्ग येथील रस्त्यांचे बांधकाम असे निकृष्ठ बनल्याने ते तोडण्यास भाग पाडले गेले, तरी आजही समर्थ मंदिर रोडवरील तडे तसेच आहे, जणू काही तो रस्ता दहा वर्षांपूर्वी बनवला गेला असेल असाच भासतो. त्यामुळे जर दर्जेदार नसेल तर ते काम पुन्हा करून घेण्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी नाही, या गोंड्स नावाखाली त्याकडं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या कामांची पाहणी करण्यासाठी आयआयटी मुंबईची नियुक्ती केली असली तरी ही संस्था सर्वच रस्त्यांची पाहणी करणार का? किंवा त्यांनी सूचवल्यानंतर काही निकृष्ठ बांधकाम झालेल्या रस्त्यांचा भाग तोडून तिथे पुनर्बांधकाम होणार का हा प्रश्न आहे. शेवटी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे साटंलोटं असल्याने तसेच कंत्राटदारावर राजकीय वरदहस्त असल्याने अधिकारीही कंत्राटदाराच्या विरोधात जाण्याचे धाडस दाखवत नाही.

मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात महापालिकेने रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यास ३६ वर्षांपूर्वी सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेने १९८९-९० पासून मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात केली. आणि मुंबईतील रस्त्यांची एकूण लांबी तेव्हा १९४१.१६ किलोमीटर एवढी होती, जी आता २०५५ किलोमीटर लांबीएवढी आहे. तेव्हापासून आजवर १३३३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रिटची कामे पूर्ण झाली आहेत, तर मागील दोन ते अडीच वर्षांमध्येच ३०० ते ३२५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे सिमेंट काँक्रिटची झाली आहे. त्यामुळे सन २०२२ पूर्वी जिथं वर्षाला सरासरी २५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटची कामे व्हायची, तिथे आता सरासरी १०० पेक्षा अधिक किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे होत आहेत. पूर्वी मोठे रस्तेच सिमेंट काँक्रिटचे केले जायचे, आता तर सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांचेही काँक्रिटीकरण केले जात आहेत.

आज उबाठा शिवसेनेचे नेते आणि माजी पालकमंत्री आदित्य ठाकरे हे रस्ते सिमेंट काँक्रिटच्या कामांच्या कंत्राटावर आगपाखड करत असले तरी त्यांची महापालिकेत सत्ता असताना तसेच अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास असताना सन २०१३-१४ ते २०१५-१६ या तीन वर्षांचा रस्ते विकासकामांचा बृहत आराखडा तयार करून १२३९ किलो मीटर लांबीच्या रस्त्यांची ७७७४ कोटी रुपयांची कामे हाती घेतली होती. पण एवढे कोटी रुपये खर्च करूनही मुंबईकरांना दिलासा मिळाला का? तर नाही! कारण त्यानंतरही खड्डयांची समस्या कायमच राहिली.

पण याचा एक फायदा झाला की त्याआधी २७ वर्षांत जिथं केवळ १९२ सिमेंट काँक्रिटद्वारे रस्त्यांचा विकास झाला होता, तिथे सन २०२२ पर्यंत ५०० ते ५५० किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनलेत. त्यामुळे मनात आणले तर प्रशासन काहीही करू शकते आणि त्यामुळे कुठे तरी सर्वच रस्ते सिमेंटीकरणाचे बनवण्याचे जे स्वप्न पाहिले, तर मग मुंबईकर म्हणून आपण स्वागत करत असलो तरी विरोधक याकडे वेगळया नजरेने पाहत असतो. कारण सर्वच रस्त्यांच्या विकासाची कामे एकदाच देवून टाकल्याने पुढे काम करायला काही राहणार नसल्याने आणि पुढे कामच राहणार नसल्याने सत्ता आल्यानंतर रिकाम्या तिजोरीची राखण करायला जावून बसायचे का असा विचार त्यांच्या मनात विचार येत असेल. त्यामुळे वारंवार विकास करूनही मुंबई खड्ड्यातच जात असल्याने तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत रस्ते खड्डेमुक्तीचा संकल्प करून सर्वच रस्त्यांचा विकास सिमेंट काँक्रिटचा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज आपल्याला सिमेंट काँक्रिटची कामे सुरू असलेली पाहायला मिळत आहे. असो, रस्त्यांवर खूप काही बोलता येवू शकते, पण करदात्यांचा पैसा खर्च करताना त्यांचा लाभ पुढील ३० ते ३५ वर्षे जनतेला व्हावा, त्यांना पुन्हा खड्ड्यात पडण्याची वेळ येवू नये हीच किमान अपेक्षा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -