Wednesday, June 18, 2025

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना अटक

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना अटक

नागपूर : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना सोनेगाव पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी (ता. १७) सायंकाळच्या सुमारास अटक केली. त्यांना कारागृहात नेत असताना, त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात आले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ साली पोलिस निरीक्षक पराग जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणात सत्र न्यायालयाने आमदार हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन कायम केला. १७ डिसेंबर २०१४ ला हिवाळी अधिवेशनादरम्यान १७ डिसेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हॉटेल प्राइडमध्ये ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक सुरू असताना, तिथे कुणालाही येऊ न देण्याचे आदेश होते. यावेळी हर्षवर्धन जाधव तिथे आले. त्यांना आतमध्ये जाण्यास सुरक्षेसाठी तैनात विशेष सुरक्षा पथकाचे पोलिस निरीक्षक पराग जाधव यांनी असलेल्या आदेशानुसार मनाई केली होती. यावेळी बैठकीत जाण्यासाठी ना. दिवाकर रावते व तत्कालिन मंत्री एकनाथ शिंदे तिथे आले.



त्यांना नेण्यासाठी बैठकीतून पर्यावरण मंत्री रामदास कदम सुट बाहेर आले. त्यांनी दोघांनाही सुटमध्ये नेले. मात्र, तत्कालिन आमदार हर्षवर्धन जाधव यांना मनाई करण्यात आल्याने त्यांनी आरडा-ओरड करीत आत जाण्याचा प्रयत्न केला. पराग जाधव यांनी त्यांना आत सोडले नाही. पुन्हा आरडाओरड करुन आमदार जाधव यांनी पराग जाधव यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर ते तेथून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी पराग जाधव यांनी सोनेगाव पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून आमदार जाधव यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीदरम्यान याप्रकरणात आमदार जाधव यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन देण्यात आला होता.

Comments
Add Comment