अबुधाबी : संयुक्त अरब अमीरात अर्थात यूएईला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ हा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे पासपोर्ट धारक भारतीय विमानाचे तिकीट खरेदी करुन थेट यूएईला जाऊ शकतील. त्यांना विमानतळावरील कार्यालयात विशिष्ट कागदपत्र सादर करताच लगेच मर्यादीत काळासाठीचा व्हिसा दिला जाईल. यामुळे यूएईला जाणे भारतीयांसाठी सोपे झाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होण्याआधीच यूएईने भारतीयांसाठी ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ सुरू केले आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी भारतीयांना दुबईत भारताचे सामने बघण्यासाठी जाणे सोपे झाले आहे.
अर्थचक्राला चालना देणे, रोजगार निर्मिती करणे आणि पर्यटनाला चालना देणे यासाठी यूएईने ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ भारतीयांना उपलब्ध करुन दिला आहे. सध्या ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ हा चार, चौदा आणि साठ दिवसांच्या पर्यायात उपलब्ध आहे.
‘या’ भारतीयांना यूएईमध्ये ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ घेता येणार
- अर्ज करण्याच्या किमान सहा महिने आधीपासून संबंधित व्यक्तीकडे भारत सरकारने दिलेला वैध पासपोर्ट असेल
- अर्ज करणाऱ्या भारतीयाकडे अमेरिका, युरोपियन यूनियन, युनायटेड किंगडम अर्थात इंग्लंड, सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा यापैकी किमान एकाचा वैध व्हिसा वा निवासी परमिट वा ग्रीन कार्ड असेल
- नियमानुसार योग्य कागदपत्रांसह आवश्यक ती माहिती देणारा विहित नमुन्यातील अर्ज सादर केला असेल
- अर्जासोबत व्हिसा फी जमा केली असेल